इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ८


सात वाजता अलार्म वाजल्यावर उठून, उद्या सकाळी लुक्झोर साठी निघायचे असल्याने पूर्वतयारी म्हणून रुममध्ये अस्ताव्यस्त पसरलेल्या सामानाची आवरा-आवर करायला घेतली. पुढच्या प्रवासात लागणाऱ्या व न लागणाऱ्या वस्तू आणि कपड्यांची विभागणी करून वेगवेगळ्या बॅग्ज भरून सज्ज केल्यावर मग तयारी करून आठ पाचला वरती नाश्ता करण्यासाठी गेलो.

हसतमुख जोसेफने नाश्ता आणि दुधाचा चहा आणून दिला. चारपाच टेबल्सवर पर्यटक कुटुंबे बसली असल्याने आणि मला पण लवकर निघायचे असल्याने त्याची इच्छा असूनही आज फार काही बोलता नाही आले.

खाणे चालू असताना मुस्ताफाचा तो खाली येऊन उभा असल्याचे सांगायला फोन आला. भरपेट नाश्ता झाल्यावर खाली उतरून साडे आठला मुस्तफाच्या गाडीत जाऊन बसलो आणि हॉटेल पासून दोन किलोमीटर्स वर असलेले आज बघायचे पहिले ठिकाण, अनफिनिश्ड ओबेलीस्क (Unfinished Obelisk) पासून सुरु होऊन अस्वान हाय डॅम (Aswan High Dam), ईजिप्शियन-सोव्हिएत फ्रेन्डशिप सिम्बॉल (Egyptian-Soviet Friendship Symbol), फिलाई टेम्पल (Philae Temple) बघून परत हॉटेलवर येण्यासाठीचा ४० कि.मी. अंतराचा परंतु जवळपास सात-आठ तास चालणारा प्रवास सुरु झाला.

पावणे नउ वाजता अनफिनिश्ड ओबेलीस्क च्या प्रवेशद्वारासमोर पोचलो आणि ६० पाउंडस चे तिकीट काढून आत प्रवेश केला. इथे आवाराच्या एका टोकाला एन्ट्री गेट आणि दुसऱ्या टोकाला एक्झिट गेट असल्याने मुस्तफा दुसऱ्या टोकाला माझी वाट बघत थांबणार होता.

ओबिलीस्क म्हणजे प्राचीन ईजिप्शियन मंदिरांच्या बाहेर उभे केलेले दगडी स्तंभ. एकसंध दगडाचे, चार बाजू असलेले आणि निमुळते होत उंच जाणाऱ्या वरच्या टोकाला पिरॅमिड सारखा आकार अशाप्रकारचे त्यांचे स्वरूप असे. चारही बाजूंवर ज्या देवतांना ते समर्पित केले आहेत त्यांची नावे, मंत्र, पशु-पक्षांची चित्रे, आणि ते बसवणाऱ्या फॅरोहचे कर्तुश कोरलेले असे.

अशाप्रकारच्या स्तंभांना त्यांचे मूळ प्राचीन ईजिप्शियन निर्माते ‘टेखेनु’ (Tekhenu) नावाने संबोधित करत होते, त्यानंतर ग्रीक लोकांनी त्यांना ओबेलीस्कोस (Obeliskos) नाव दिले. मग लॅटीन ते इंग्लिश असा प्रवास होऊन शेवटी आज ओबेलीस्क (Obelisk) म्हणून ओळखले जातात.
हजारो वर्षांपासून अस्वान मधल्या खाणींमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या दर्जेदार लाल, राखाडी व काळ्या रंगाच्या ग्रॅनाइटचा वापर संपूर्ण ईजिप्त मध्ये पिरॅमिडस, मंदिरे, किल्ले, महाल अशा शेकडो वास्तू, आणि पुतळे, शिल्पे, शवपेट्या अशा हजारो वस्तूंच्या निर्मितीसाठी केला गेला. अशाप्रकारच्या अनेक खाणींपैकी, उत्तर अस्वान मधल्या लाल ग्रॅनाइटच्या एका खाणीत, ई.स.पु. पंधराव्या शतकात प्राचीन ईजिप्त मधली, शक्तिशाली आणि कर्तृत्ववान म्हणून नोंद झालेली इतिहासातली दुसरी महिला फॅरोह ‘हॅतशेपस्युत’ हिच्या आज्ञेने एक ओबिलीस्क कोरण्यास सुरुवात झाली.

तयार झाल्यावर ईजिप्तच्या इतिहासातील सर्वात मोठा ठरणारा ४२ मीटर्स (१३७ फुट) उंचीचा आणि १२०० टन वजनाचा असा हा ओबिलीस्क लुक्झोर येथील कर्नाक मंदिरात हॅतशेपस्युतनेच आधी उभारलेल्या ओबिलीस्कच्या जोडीला उभारण्याचा तिचा मानस होता. परंतु ज्या एकसंध दगडात तो कोरला जात होता त्या मूळ दगडाला (कदाचीत भूकंपामुळे) तडे जाऊन त्याचे अखंडत्व भंग पावल्यामुळे काम अर्ध्यावर सोडून देण्यात आले. निर्मिती पूर्णत्वास जाऊ न शकलेला असा हा ओबिलीस्क त्याच्या अपूर्ण स्वरूपामुळे ‘अनफिनिश्ड ओबिलीस्क’ म्हणून ओळखला जातो.

भूकंपामुळे कि अन्य कुठल्या कारणामुळे तडे गेल्यामुळे काम अपूर्ण राहिले असले तरी त्या निमित्ताने प्राचीन काळातील ओबिलीस्कच्या निर्मिती प्रक्रियेचे रोचक आणि कल्पक असे रहस्य उलगडण्यास फार मोठा हातभार लागला.

अखंड कातळात, जेवढी उंची आवश्यक असेल त्यापेक्षा थोडा जास्त लांबीचा, आणि चारही बाजूंच्या ईच्छित रुंदी पेक्षा थोडा जास्त रुंद आणि चारही बाजूंनी थोडा जास्त उंच असा ओबिलीस्कचा आडवा आकार कातळात कोरून झाल्यावर त्याला मूळ कातळापासून वेगळा करण्यासाठी खालच्या बाजूला एका रेषेत अनेक भोके पाडली जात. मग त्या भोकांमध्ये लाकडी पाचरी ठोकून ओबिलीस्कचा आकार कोरताना चारही बाजूंनी तयार झालेल्या चरांमध्ये पाणी भरून त्या पाचरी भिजवून ठेवत. काही काळात त्या लाकडी पाचरी पाण्यामुळे फुगून प्रसरण पावल्याने वरचा कोरीव आकाराचा दगड थोडा वर रेटला जाऊन खालच्या मूळ कातळापासून विलग होत असे. त्यानंतर तो भलामोठा कच्च्या आकाराचा दगडी ठोकळा बाहेर काढून, कारागीर त्याला सर्व बाजूंनी प्रमाणबद्ध आकारात तासून त्याच्यावर कोरीव काम करत. अशाप्रकारे खाणीतच पूर्णपणे तयार झाल्यावर मग त्या ओबिलीस्कला नाईलच्या किनाऱ्यापर्यंत आणून तराफ्यावरून ईच्छितस्थळी वाहून नेऊन त्याची उभारणी केली जात असे.

अनफिनिश्ड ओबेलीस्कची काही छायाचित्रे

ओबडधोबड, अर्धवट, तरीही प्रेक्षणीय असा हा ओबिलीस्क पाहून दहा वाजता दुसऱ्या टोकाच्या एक्झिट गेट मधून बाहेर पडून गाडीत बसलो आणि अर्ध्या तासात तिथून १७ कि.मी. अंतरावरच्या अस्वान हाय डॅमला पोचलो. रस्त्यावरच असलेल्या, टोल नाक्यासारख्या बुथवर ३० पाउंडसचे तिकीट घेतले.

जाण्या-येण्याच्या प्रशस्त मार्गिका आणि चांगल्या रुंद डिव्हायडरच्या मध्यभागी छान मोठी झाडे असलेल्या रस्त्यावरून धरणाच्या मध्यभागी आल्यावर मुस्तफाने गाडी रस्त्याच्या कडेला पार्क केली आणि आम्ही दोघं चालत निघालो.

ईजिप्तला दरवर्षी भेडसावणाऱ्या, एकतर पूर किंवा दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तींवर कायमस्वरूपी उपाय आणि वाढत्या लोकसंख्येबरोबर वाढत जाणारी विजेची गरज भागवण्याच्या दुहेरी उद्देशाने देशाचे तत्कालीन अध्यक्ष ‘गमाल अब्देल नासेर’ ह्यांनी १९५८ साली सोव्हिएत युनियनच्या आर्थिक आणि तांत्रिक सहकार्याने, अस्वानच्या दक्षिणेला नाईल नदीवर हे धरण बांधण्याचा निर्णय घेतला.

शीत युद्धाच्या त्या कालखंडात ब्रिटन आणि अमेरिकेने संयुक्तरीत्या काही जाचक अटींवर ह्या धरणाच्या बांधकामासाठी मदत देऊ केली होती, परंतु त्यांच्या अटींमुळे देशाच्या सार्वभौमत्वास बाधा येत असल्याने आणि त्या काळात घडलेल्या काही आंतरराष्ट्रीय गुंतागुंतीच्या घटनांमुळे नासेरने त्यांची मदत न स्वीकारता, सोव्हिएत युनियनच्या सहकार्याने हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केला.

जानेवारी १९६० मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन जानेवारी १९७१ मध्ये पूर्ण झालेल्या ह्या धरणाच्या प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या ‘लेक नासेर’ ह्या ५०० किलोमीटर्स लांबीच्या कृत्रिम जलाशयामुळे नुबिया प्रांतातल्या काही ग्रॅनाइटच्या खाणी आणि ऐतिहासिक वास्तू कायमस्वरूपी पाण्याखाली गेल्या (अबू सिंबेल येथील मंदिरांचे स्थलांतर करण्यात यश आले.), परंतु देशाच्या प्रगतीस बराच हातभार लागला.

गिझा येथील पिरॅमिडसच्या १७ पट वस्तुमानाचे, जवळजवळ, ४ किलोमीटर्स (३८३० मीटर्स) लांब, तळाशी १ किलोमीटर (९८० मीटर्स) रुंद आणि १११ मीटर्स (३६४ फुट) उंच असलेल्या ह्या धरणाचा वरचा पृष्ठभाग ४० मीटर्स रुंदीचा आहे.

इथल्या जलविद्युत निर्मिती प्रकल्पातल्या प्रत्येकी १७५ मेगावॉट क्षमतेच्या १२ जनित्रांमधून निर्माण होणाऱ्या विजेने त्या काळातली देशाची अर्धी विजेची गरज भागली आणि दक्षिणेची कित्येक खेडी प्रकाशमान होऊन औद्योगिक क्षेत्रात वाढ झाली. तसेच पूर्वीपेक्षा एक तृतीयांश अधिकचे क्षेत्रफळ लागवडीखाली आले.

साम्यवादी सोव्हिएत युनियनचा सहभाग असल्याने निर्मिती अवस्थेत असताना, पाश्चिमात्य देशांमधील रशियाद्वेषाने प्रेरित (तथाकथित तज्ञ) टीकाकारांनी ‘नासेरचा पिरॅमिड’, ‘गरीब देशाने पोसायला घेतलेला पांढरा हत्ती’ अशी हेटाळणी केलेला हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण क्षमतेनी कार्यान्वित झाल्यावर प्रत्यक्षात ईजिप्त साठी अनेक बाबतीत फायदेशीर ठरला.

अस्वान हाय डॅम परिसरातली काही छायाचित्रे.


नाईल नदी.

लेक नासेर.

धरणाच्या दोन्ही बाजूंचा परिसर बघून झाल्यावर तिथून निघून पश्चिम दिशेला जवळच असलेला ईजिप्शियन-सोव्हिएत फ्रेन्डशिप सिम्बॉल जवळ आम्ही पोचलो.
अस्वान हाय डॅम प्रकल्पाच्या निमित्ताने ईजिप्त आणि सोव्हिएत युनियनमध्ये झालेल्या दृढ मैत्रीचे प्रतिक म्हणून उमलणाऱ्या कमळाच्या फुलासारखे दिसणारे हे भव्य स्मारक, प्रकल्प शेवटच्या टप्प्यात आला असताना बांधण्यात आले.
कैरो मधल्या ‘कैरो टॉवर’ एवढ्याच उंचीचे, म्हणजे १८७ मीटर्स (६१४ फुट) उंच असलेले हे स्मारक खालून बघण्यासाठी कोणतेही शुल्क नसून लिफ्टने वर जाऊन बघायचे असल्यास ५० पाउंडसचे तिकीट आहे, परंतु त्यावेळी लिफ्टच्या देखभालीचे काम सुरु असल्याने मला वर नाही जाता आले.
कमळाच्या पाकळ्यांच्या आकाराचे पाच नक्षीदार मनोरे आणि वरती जाऊन आजूबाजूचा परिसर बघण्यासाठी वरच्या बाजूला मनोऱ्यांना आतल्या बाजुने जोडणारी अंगठी सारखी गोलाकार गॅलरी असे त्या स्मारकाचे स्वरूप आहे.

ईजिप्शियन-सोव्हिएत फ्रेन्डशिप सिम्बॉलची काही छायाचित्रे.

‘सोव्हिएत युनियन’ ह्या नावाची अॅलर्जी असल्याने असेल कदाचित, पण इंटरनेटवर ईजिप्त मधल्या पर्यटना बद्दल माहिती देणाऱ्या संकेतस्थळांवर आणि बहुतांश युरोपियन आणि अमेरिकन प्रवाशांच्या ब्लॉग्स वर (अपवादाने त्रोटक उल्लेखाशिवाय) ह्या सुंदर स्मारका विषयीची कुठलीही माहिती वाचायला मिळत नाही, उलट ‘नावडतीचे मीठही अळणी’ ह्या म्हणीप्रमाणे अस्वान हाय डॅम आणि परिसरात विशेष काही बघण्यासारखे नसून तिथे जाणे टाळले तरी चालेल असे सल्ले वाचायला मिळतात.

पावणेबारा वाजता इथून बाहेर पडल्यावर १४ किलोमीटर्स वर असलेल्या फिलाई टेम्पलला जायला निघाल्यावर मुस्तफाने थोडं पुढे गेल्यावर गाडी डावीकडे खाली उतरणाऱ्या रस्त्यावर वळवली आणि एक किलोमीटर खाली आल्यावर तिथल्या फेरी बोटींच्या धक्क्यावरून थोड्या अंतरावर दिसणारे एका बेटावरचे ‘कलाबशा’ मंदिर (Kalabsha Temple) दाखवले. प्राचीन ईजिप्शियन संस्कृतीतला ‘हॉरस’ देव जो नुबिया मध्ये ‘मंडूलीस’ नावाने पुजला जात होता, त्याला समर्पित केलेले हे मंदिर, ई.स.पु. पहिल्या शतकाच्या उत्तरार्धात रोमन राजवटीत सम्राट ‘ऑगस्टसने’ बांधायला घेतले होते परंतु ह्या भव्य मंदिराचे अगदी थोडेसे काम अपूर्ण राहिले. लेक नासेर जलाशयात पाण्याखाली जाणारे हे मंदिर १९७० मध्ये जर्मनीच्या सहकार्याने १३००० तुकड्यांमध्ये कापून त्याच्या मूळ स्थानापासून सुमारे ३० कि.मी. अंतरावरच्या ह्या छोट्या बेटावर पुनर्स्थापित केले आहे. तिथे पोचण्यासाठी बोटीने जावे लागते.

लांबूनच हे मंदिर बघून परत वरच्या रस्त्याला लागून पुढचा प्रवास सुरु झाला. नाईलच्या किनाऱ्यावर असलेल्या फिलाई टेम्पलच्या तिकीट काउंटर वर आम्ही १२:४० ला पोचलो आणि रांगेत उभा राहून १०० पाउंडसचे तिकीट काढले.

गाडी पार्किंगलॉट मध्ये लाऊन मुस्तफा मोटर बोटींच्या धक्क्यापर्यंत माझ्या बरोबर चालत आला. ह्या मंदिराचा परिसर बराच मोठा आहे आणि ते बघण्यासाठी लागणारा वेळ व्यक्तिगणिक बदलत असल्याने बोटीचे प्रतिव्यक्ती तिकीट नसून, किती प्रवासी आहेत त्यानुसार योग्य आकाराची मोटर बोट आपल्यापाशी उपलब्ध असलेल्या वेळेच्या हिशोबाने ठराविक तासांसाठी भाड्याने घ्यावी लागते. इथे वाजवी भाड्यासाठी बरीच घासाघीस करावी लागत असल्याने मुस्तफा माझ्या बरोबर आला होता.

२-४ नावाड्यांशी असफल बोलणी झाल्यावर, बोटभाडे शेअर करण्यासाठी पार्टनरच्या शोधात असलेले एक अमेरिकन आजोबा भेटले. त्यांनी इथे येण्यापूर्वी बराच अभ्यास केला असल्याने ह्याठिकाणी दोन ते अडीच तास आवश्यक असल्याचे त्यांचे मत होते. माझ्याकडेही तेवढा वेळ होता म्हणून मी होकार दिल्यावर तीन तासांसाठी ३५० पाउंडस पासून सुरु होऊन अखेरीस अडीच तासांसाठी १५० पाउंडस एवढ्या भाड्यावर सौदा पक्का झाला, आणि आम्ही बोटीत बसलो. परत आल्यावर पार्किंग मधेच भेटा आणि गाडी नाही सापडली तर मला फोन करा असे मुस्तफाने निघताना सांगितले.

मिसिसिपी येथे राहणारे, ८० वर्षाचे हेन्री नावाचे हे आजोबा निवृत्त शिक्षक होते. निवृत्तीनंतर एका एनजीओ साठी काम करत असताना त्यांनी पंधरा वर्षांपूर्वी काहीकाळ दिल्ली आणि बंगाल मध्ये वास्तव्य केले होते. ईजिप्तला येताना ते आधी लंडन मध्ये भ्रमंती करून आले होते आणि तिथून ईजिप्तची सगळ्या ठिकाणांची नकाशासकट भरपूर माहिती असलेली दोन पुस्तकेही बरोबर घेऊन आले होते.

१०-१२ मिनिटांत आम्ही अगील्कीया बेटावर पोचलो. थोड्या पायऱ्या चढून वर आल्यावर सुरक्षा तपासणी पार पाडून इसिस देवीच्या मुख्य मंदिराच्या समोरच्या भागात पोचलो.

ई.स.पु. चौथ्या शतकात ग्रीको-रोमन राजवटीत बांधलेले इसिस देवीचे हे प्राचीन मंदिर अगील्कीया बेटावर पुनर्स्थापित करण्यापूर्वी ज्या बेटावर होते त्या मूळ फिलाई (किंवा फिले) ह्या बेटाच्या नावानेच प्रसिध्द आहे. १९०२ साली जुने अस्वान धरण (अस्वान लो डॅम) बांधल्यावर वर्षातील जवळपास सहा महिने अर्धे मंदिर पाण्याखाली जात असे. त्यानंतर अस्वान हाय डॅमचे काम पूर्ण झाल्यावर परिस्थिती आणखीन गंभीर होऊन मंदिरा सहित हे संपूर्ण बेटच पाण्याखाली बुडाले.

युनेस्को आणि ईजिप्शियन सरकारच्या पुरातत्व विभागाने संयुक्तपणे अबू सिंबेलच्या मंदिरां प्रमाणेच ह्या मंदिराचेही स्थलांतर करून जवळच्या अगील्कीया बेटावर पुनर्स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे १९७२ ते १९८० ह्या कालावधीत हे काम पूर्ण होऊन ह्या ऐतिहासिक वारशाला कायमची जलसमाधी मिळण्यापासून वाचवले गेले.

हे मंदिर स्थलांतरित करण्याच्या मोहिमेची कहाणी मोठी रोचक आहे. आधी संपूर्ण बेटा भोवती (मूळ ठिकाणच्या) जाड लोखंडी पत्र्यांच्या दुहेरी भिंती उभारून त्यांच्या मधल्या जागेत वाळू भरून एक धरणासारखी संरक्षक भिंत (Coffer Dam) तयार केली. त्यानंतर आतल्या भागातील पाणी पंपाद्वारे बाहेर टाकून तो कोरडा केल्यावर, मंदिराच्या बांधकामाचे सुमारे ४०००० हजार तुकडे कापून प्रत्येक तुकड्यावर खुणा करून ते जवळच्या अगील्कीया बेटावर वाहून आणले आणि मुळचा आकारात पुन्हा जोडले.

अतिप्राचीन काळी इसिस देवी (ISIS) ईजिप्तमध्ये अंत्यसंस्काराची देवी मानली जात होती. एका दंतकथेनुसार तिचा पती ओसिरीस (Osiris) ह्याची त्याच्या भाऊ ‘सेठ’ ह्याने हत्या करून त्याच्या देहाचे असंख्य तुकडे केले. इसिसने ते विखुरलेले तुकडे एकत्र करून आपल्या दैवी शक्तीने ओसिरीसला पुन्हा जिवंत केले. त्यानंतर ती जीवन दायिनी म्हणूनही मानली जाऊ लागली. आणि ओसिरीस मृत्युपश्चात मनुष्याच्या पाप-पुण्याचा हिशोब करून त्यांचा निवडा करणारा देव मानला जाऊ लागला. पुढे त्यांना झालेला पुत्र ‘हॉरस’ ह्याने त्याचा काका (वाळवंट, वादळ, अराजक आणि हिंसेचा देव) ‘सेठ’ ह्याचा युद्धात पराभव करून विजय मिळवल्याने तो सूर्याचा अवतार मानला जाऊन त्याला देवत्व प्राप्त झाले. आणि हॉरस देवाची आई इसिस हि देवांची आई म्हणूनही ओळखली जाऊ लागली.

इसिस, ओसिरीस आणि हॉरस ह्या तीनही शक्तिशाली मानल्या गेलेल्या प्राचीन दैवतांची मंदिरे असलेल्या ह्या फिलाई टेम्पल आणि परिसराची काही छायाचित्रे.

हेन्री आजोबांबरोबर विलक्षण माहिती ऐकत हे मंदिर बघायला खूप मजा आली. सव्वा तीनला आम्ही आमची वाट बघत बोटीत थांबलेल्या नावाड्यापाशी आलो आणि परत किनाऱ्याच्या दिशेने प्रवास सुरु झाला.

पार्किंग मध्ये उभी असलेली गाडी शोधायला काही अडचण नाही आली. तिथून हॉटेल पर्यंतचे अंतर १० कि.मी. होते, वीस-पंचवीस मिनिटांत पोचलो असतो.पण भूक लागल्याने जवळच्या एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन मुस्तफाच्या शिफारशीवरून गिझा मध्ये खाल्लेली पण न आवडलेली कोशरी पुन्हा खाण्याचे धाडस केले. अनुभव सारखाच होता, इथलीही कोशरी मला काही आवडली नाही. बळेबळे ती खाऊन, डाळिंबाचे ज्यूस पिऊन आम्ही तिथून बाहेर पडलो आणि मार्गाला लागलो.

साडेचार वाजता आम्ही आयमनच्या दुकानावर पोचलो. अजून नुबियान म्युझियम बघायचे बाकी होते त्यामुळे रूमवर जाऊन थोडावेळ आराम करण्या एवढा वेळ नसल्याने तिथेच उन कमी होई पर्यंत टाईमपास करत बसलो. आयमनचा शिशा आणि आमच्या तिघांच्या गप्पा बराचवेळ चालू होत्या. उद्या लुक्झोरला जाण्यासाठीही मुस्ताफाचीच गाडी बुक केली होती परंतु त्याला, त्याच्या सात महिन्याच्या गर्भवती बायकोला तपासणीसाठी दवाखान्यात न्यायचे असल्याने तो स्वतः न येता ड्रायव्हरला पाठवणार असल्याची माहिती मुस्तफाने दिली.

साडेपाचला दोघांचा निरोप घेऊन मी नुबियान मुझीयमला जायला निघालो आणि रमत गमत १५ मिनिटांत तिथे पोचलो आणि १०० पाउंडसचे तिकीट काढून आत गेलो.

आत गेल्यावर पहिल्या प्रशस्त दालनामध्ये शेकडो जुने कृष्ण-धवल फोटो माहितीसहित फ्रेम करून लावले आहेत. नुबियामध्ये किती प्राचीन वास्तू होत्या, त्यातल्या किती लेक नासेर जलाशयात बुडाल्या वगैरेची माहिती हे फोटो बघून मिळते पण बारीक अक्षरातली त्याची माहिती वाचण्यात खूप वेळ जातो. त्याच दालनात एका बाजूला काही शिलालेख आणि अगदीच पुसटशा आकृत्या दिसणारी दगडांवर कोरलेली प्राणी – पक्षांची चित्रे आणि तीन शवपेट्या देखील आहेत.
थोडं खाली उतरून गेल्यावर असलेल्या दुसऱ्या दालनात छोटे-मोठे राखाडी ग्रॅनाइटचे पुतळे आणि मुर्त्या छान आहेत. पहिल्या मजल्यावर काही पपायरस वरची चित्रे, लेखन आणि जुन्या काळातली नाणी, हत्यारे प्रदर्शित केली आहेत.
ह्या म्युझियमची ईमारत चांगली बांधली आहे, संग्रहातल्या वस्तूही चांगल्या आहेत पण इथे मन काही रमेना. कैरोचे भव्य म्युझियम आधी बघितले असल्यामुळे असेल कदाचित, पण हे आणि काल बघितलेले अस्वान म्युझियम दोन्ही पानी कम वाटत होते. शेवटी उभं राहायचा कंटाळा आल्यामुळे मी वर वर सगळ्या वस्तू बघून साडेआठला तिथून बाहेर पडलो.

नुबियान म्युझियमची इमारत आणि त्या बाहेरचा छोटा ओबिलीस्क.

कालच्याच स्टॉल वरून एक फलाफेल आणि एक फ्राईड पोटॅटो सँडविच पार्सल घेऊन हॉटेल गाठले. रूमवर येऊन फ्रेश झाल्यावर टी.व्ही. वर लागलेला ‘टेकन’ बघत, काल आणून ठेवलेल्या स्टेला रिचवल्यावर मग सँडविचेस चा फडशा पडला. पिक्चर संपल्यावर आजच्या सारखेच सकाळी साडेआठला ब्रेकफास्ट करून निघायचे असल्याने सव्वा सातचा अलार्म लावून झोपून गेलो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय नेम इज बॉंड... जेम्स बॉंड!

दुबई : मरूभूमितले नंदनवन - भाग १

कॅवलरी टँक म्युझियम (रणगाडा संग्रहालय) - अहमदनगर

मिपा श्रीगणेश लेखमाला २०२३ - "मी धनंजय माने, आणि हा माझा बायको पार्वती"

इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ११

इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – १०

इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ३

।। 'हिंग' पुराण - अध्याय दुसरा ।।

।। 'हिंग' पुराण - अध्याय तिसरा ।। (अंतिम)

इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ९