कॅवलरी टँक म्युझियम (रणगाडा संग्रहालय) - अहमदनगर

१६ एप्रिल २०२२ रोजी अहमदनगर शहरातील आशिया खंडातील पहिले (आणि बहुतेक एकमेव) अशी ख्याती असलेले “कॅवलरी टँक म्युझियम” अर्थात ‘रणगाडा संग्रहालय’ पहाण्याचा योग आला. अहमदनगर - सोलापूर रस्त्यावर शहराच्या ‘इवळे’ परीसरात प्रचंड मोठे क्षेत्रफळ व्यापणाऱ्या ह्या रणगाडा संग्रहालयाच्या प्रवेशाच्या कमानीच्या दोन्ही बाजुंना भारतीय बनावटीचे ‘विजयंता’ रणगाडे ठेवले आहेत. गमतीची गोष्ट म्हणजे भर रस्त्यात, उघड्यावर ठेवलेल्या ह्या रणगाड्यांचे आणि कमानीचे फोटो काढण्यास मनाई आहे. कमानी जवळ तैनात असलेल्या जवाना कडील रजीस्टर मध्ये आपले नाव, गाव, फोन नंबरची नोंद केल्यावर तिथुन सुमारे दिड ते दोन की.मी. अंतरावर असलेल्या संग्रहालयाकडे जाण्याचा आपला मार्ग खुला होतो. आतल्या रस्त्याच्या दुतर्फाही वेगवेगळ्या बनावटीचे रणगाडे ठेवले आहेत. त्यापैकी काही रणगाड्यांची चालत्या गाडीतून टिपलेली छायाचित्रे- 1 2 3 4
पार्किंग जवळ ठेवलेला ‘टोपाझ’ (Topaz) रणगाडा
5 शक्तीशाली इंजिन, २० सैनीक वाहुन नेण्याचा क्षमता, ३६० अंशातून बाहेर लक्ष ठेवण्याची सोय असलेला आणि जमीनीवरून तसेच पाण्यातुनही जाऊ शकणारा अशी अनेक वैशिष्ट्ये असणारा उभयचर गटातला हा रणगाडा पुर्वाश्रमीचा चेकोस्लोव्हाकिया आणि पोलंडने संयुक्तरीत्या तयार केला होता. १९६४ मध्ये चेकोस्लोव्हाकिया आणि १९६६ मध्ये पोलंडने वापरात आणलेला हा रणगाडा पुढे भारत, अंगोला, बल्गेरिया, ईजिप्त, ईराक, लिबिया, मोरोक्को आणि सुदान अशा देशांच्या सैन्यदलांत दाखल झाला होता. ‘टोपाझ’ रणगाड्याचा अंतर्भाग - topaz 6 पार्किंग पासुन सुमारे दीडशे मीटर अंतरावर तिकीट काउंटर असुन लहान मुलांसाठी ₹ २५/- मोठ्यांसाठी ₹ ५०/- फोटोग्राफी साठी ₹ ५००/- असे तिकिटांचे दर आहेत. 7 आधुनिक स्वयंचलित रणगाड्यांचा वापर विसाव्या शतकात सुरु झाला असला तरी त्यांचा इतिहास पंधराव्या शतकापासून सुरु होतो. रणगाड्याची मूळ संकल्पना पंधराव्या शतकातला सुप्रसिद्ध चित्रकार आणि संशोधक 'लिओनार्दो दा विंची' (Leonardo da Vinci) ह्याने सर्वप्रथम मांडली होती आणि चिलखती वॅगन वर तोफ बसवून रणगाडा सदृश्य वाहन तयार करून पहिल्यांदा त्याचा प्रत्यक्ष रणभूमीवर वापर करण्याचे श्रेय पंधराव्या शतकातला पराक्रमी चेक जनरल 'जन जिझका' (Jan Zizka) ह्याला जाते. रणगाड्यांचा इतिहास दर्शवणारा फलक- info 1994 साली लष्कराचे तत्कालीन जनरल बी. सी. जोशी ह्यांच्या हस्ते उदघाटन झालेल्या ह्या संग्रहालयात चाळीस-पंचेचाळीस रणगाडे आणि काही रणगाड्यांच्या प्रतीकृती, त्यांचे फोटोज व भारतीय सेनेच्या पराक्रमाची गौरवशाली गाथा दर्शवणाऱ्या दोन गॅलरीज इथे आपल्याला बघायला मिळतात. सुरुवातीला प्रत्येक रणगाड्याचे बारकाईने निरीक्षण करण्यात आणि त्यांची वैशिष्ट्ये समज़ुन घेण्यात बराच वेळ घालवत होतो पण घरच्या मंडळींना वेळेचे भान होते (आणि त्यांना भुकही प्रचंड लागली होती) त्यामुळे पुढचे काही रणगाडे आणि गॅलरीज बघण्याचा कार्यक्रम घाईघाईने उरकावा लागला. तिथे पाहीलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण रणगाड्यांचे फोटो + माहिती आणि बाकीच्यांचे फक्त फोटोज खाली देत आहे.
‘रोल्स रॉइस’ (Rolls Royce)
8 9 डिसेंबर १९१४ मध्ये रोल्स रॉइसच्या ‘सिल्व्हर घोस्ट’ ह्या कारचे रूपांतर चिलखती वाहनात केले गेले आणि हे त्या काळातील सर्वात यशस्वी आर्मर्ड कॉर्प्स वाहन ठरले. पहिल्या महायुद्धात त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. ह्या चिलखती वाहनाचे पराक्रम फ्रान्स, इजिप्त, पूर्व आफ्रिका आणि रशियामध्ये युद्धकाळात पाहायला मिळाले. दोन्ही महायुद्धांच्या दरम्यान ब्रिटिश राजवटीत पोलिस दलासाठी आणि अंतर्गत सुरक्षेसाठी ह्या वाहनाचा वापर केला जात असे. १३ एप्रिल १९१९ या दिवशी पंजाबमध्ये झालेल्या कुप्रसिद्ध जालियनवाला बाग हत्याकांडाच्यावेळी जनरल डायरने ह्याच कारचा उपयोग केला होता असे म्हणतात. १९२० मध्ये तिचे इंजिन अपग्रेड केले गेले आणि स्पोक व्हील्सच्या ऐवजी डिस्क व्हील्स बसवण्यात आली. १९२१ मध्ये त्यावर टरेट (Turret) बसविण्यात आले आणि त्यात मशीन गन बसवण्यात आली होती ज्याला व्हिकर म्हणतात, तसेच मागील चाकांचा आकार मोठा करण्यात आला. तिच्या टरेट मधुन आत बसलेल्या क्रूला पुढे असलेल्या क्षेत्राचे दृश्य स्पष्ट दिसण्यासाठी त्यावर लहान छिद्रे ठेवली आहेत. ६ सिलेंडरचे पेट्रोल इंजिन बसवण्यात आलेल्या ह्या कारची वेगमर्यादा ताशी ४५ कि.मी. होती.
‘शर्मन क्रॅब' (Sherman Crab)
10 शत्रूने पेरलेले भुसुरुंग नष्ट करत मागून येणाऱ्या सैन्याचा मार्ग मोकळा करण्याच्या उद्देशाने ब्रिटिश आर्मीसाठी 1944 साली विकसित करण्यात आलेला 'शर्मन क्रॅब' हा अवाढव्य आकाराचा रणगाडा मला फारच आवडला, बाहुबली सिनेमातील भल्लालदेवचा फिरती पाती बसवलेला रथच आठवला एकदम. हा रणगाडा समोरून येताना पाहून शत्रू सैन्याची काय अवस्था होत असेल ह्याची कल्पना त्याचे अक्राळ विक्राळ रूप बघूनच येते. शत्रूपक्षाने जमिनीत पेरलेले भुसुरुंग उखडून पुढे फेकून देण्यासाठी किंवा त्यांचा जाणीवपूर्वक स्फोट घडवून आणण्यासाठी ह्याच्या पुढे 'mine flail' उपकरण बसवले असून त्याच्या फिरत्या ड्रमला खालच्या टोकाला लोखंडी गोळे असलेल्या जमिनीपर्यंत लोंबकळणाऱ्या दणकट साखळ्या जोडलेल्या आहेत. ह्याची मजबुती एवढी आहे की पुढे भुसुरुंगाचा स्फोट झाला तरी ह्याचे काही नुकसान होत नसे. ह्या रणगाड्याची काही वैशिष्ट्ये - उत्पादक : ब्रिटन वापरकर्ते: ब्रिटन, युनायटेड स्टेट्स आणि कॅनडा लांबी: 6.6 मीटर रुंदी: 2.62 मीटर उंची: 2.74 मीटर वजन: 31.6 टन कमाल वेग: ताशी 40 किमी आणि डी-माइनिंगचे काम सुरु असताना ताशी 1.5 किमी मुख्य शस्त्रास्त्र: एक 75 मिमी तोफ दुय्यम शस्त्रास्त्र: सह-चालकासाठी एक ब्राउनिंग 7.62 मिमी मशीन गन आणि टरेट मधून आणखीन एक ब्राउनिंग 7.62 मिमी मशीन गन इंजिन: 6 सिलेंडरचे पेट्रोल इंजिन क्रू सदस्य : 5 (कमांडर, गनर, रेडिओ ऑपरेटर, चालक, सह-चालक) ह्या रणगाड्याच्या रिमोट कंट्रोल्ड मॉडेलचा खाली एम्बेड केलेला युट्युब वरील व्हिडीओ बघून त्याच्या कार्यशैलीची थोडीफार कल्पना येते.
'चर्चील ब्रिज लेयर' (Churchill Bridge Layer)
11 12 आधीच्या 'चर्चील' रणगाड्यात काही सुधारणा करून 1942 साली तयार करण्यात आलेला 'चर्चील ब्रिज लेयर' हा रणगाडा म्हणजे अभियांत्रिकीचा एक उत्तम नमुना आहे. हायड्रॉलीक तंत्रज्ञानाचा वापर करून केवळ 2 मिनिटात 30 फूट लांबीचा अतिशय मजबूत पूल सैन्याला वापरासाठी उपलब्ध करून देण्याची ह्याची क्षमता होती. दुसऱ्या महायुद्धात इटली आणि वायव्य युरोपमध्ये महत्वपूर्ण कामगिरी बजावणारा हा रणगाडा 1960-1961 पर्यंत सेवेत होता. ह्या रणगाड्याचे कार्य कशापद्धतीने चालायचे हे खालील छोट्याशा व्हिडीओत पाहता येईल.
'विजयंता' (Vijayanta)
13 14 14-a ब्रिटनच्या 'ब्रिटिश व्हिकर्स लिमिटेड' कंपनीने 1963 मध्ये विजयंताचे प्रोटोटाईप तयार करून दिल्यावर त्यात काही सुधारणा करून चेन्नईजवळील आवडी येथील हेवी व्हेईकल फॅक्टरीमध्ये ह्या रणगाड्यांचे उत्पादन सुरु झाले. संपूर्णपणे भारतीय बनावटीचा पाहिला रणगाडा अशी 'विजयंता' ची ओळख आहे. ताशी 50 किमी वेगाने चालू शकणाऱ्या ह्या रणगाड्याचे वजन 43 टन होते. 105 मी. मी. ची तोफ आणि मशिनगन्सने सुसज्ज असलेल्या विजयंता रणगाड्यांनी 1971 च्या भारत - पाकिस्तान युद्धात मोलाची कामगिरी बजावली होती. 1966 पासून भारतीय लष्कराच्या विविध चिलखती तुकड्यांत दाखल झालेल्या विजयंता रणगाड्यांना 2004 साली निवृत्त करण्यात आले.
'जर्मन फ्लॅक - अँटी एअरक्राफ्ट/आर्मर फिल्ड गन' (German FLAK Anti Aircraft/Armour Field Gun)
15 हिटलरच्या नाझी सैन्याकडून प्रभाविपणे वापरली गेलेली अँटी एअरक्राफ्ट गन. हिला FLAK हे नाव 'Flugabwehrkanone' ह्या जर्मन शब्दावरून दिले गेले ज्याचा अर्थ होतो 'aircraft defense cannon'. 30,000 फुटांपेक्षा अधिक उंचीवरच्या लक्ष्याचा भेद करण्याची हिची क्षमता होती.
'8RAD (श्वेरर पॅंझरस्पॅहवॅगन) / Schwerer Panzerspahwagen'
16 17

दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या पॅंझर रणगाड्यांनी धडाकेबाज कामगिरी करत घवघवीत यश प्राप्त केले होते त्या पथकातील ही आर्मर्ड कार. हिचा उपयोग मुख्यत्वे शत्रूच्या प्रदेशात शिरून टेहाळणी करणे आणि त्याच्या लष्करी छावण्या, युद्ध सज्जता, रसदीची माहिती मिळवणे ह्या कामांसाठी केला जात असे.

-----

आता ह्यापुढे बाकीच्या रणगाड्यांचे फक्त फोटोज देत आहे. इच्छुक्कांना त्यांच्या बद्दलची तपशीलवार माहिती https://tanks-encyclopedia.com/ ह्या वेबसाईट किंवा विकीपीडिया वर मिळू शकेल.

'Lion' (Bakhtawar)
18
'शर्मन' (Sherman)
19 19-a
'टी 54' (T 54)
20 20-a
'चाफी' (Chaffee)
21 21-a
'एम 48 पॅटन' (M 48 Patton)
23 24
'वॉकर बुलडॉग' (Walker Bulldog M 41)
26 26-a
'ए 9 क्रूझर' (A 9 Cruiser)
27
'एम 3 ग्रॅण्ट' (M3 Grant)
28
'स्टुअर्ट' (Stuart M3 A3)
29
'एल वाय एन एक्स १' (LYNX1)
30 30-a
'एस पी सेक्स्टन' (SP Sexton)
31
'एस पी आर्चर' (SP Archer)
32
'चर्चील' (Churchill)
33
'शर्मन डी डी' (Sherman DD)
34
'एल व्ही टी (ए) 4 [LVT (A) 4]
35 -----

अशा गोष्टींची आवड असणाऱ्यांनी आवर्जून बघावे असे हे संग्रहालय आहे. तीन ते चार तासांचा वेळ हाताशी असल्यास अगदी व्यवस्थित बघता येईल, आत भरपूर झाडे असल्याने उन्हाचा त्रासही होत नाही. ह्याच संग्रहालयाच्या आवारात 'फरिया पॅलेस' ही प्राचीन वास्तुही आहे परंतु वेळे अभावी आम्हाला ती बघता आली नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय नेम इज बॉंड... जेम्स बॉंड!

दुबई : मरूभूमितले नंदनवन - भाग १

मिपा श्रीगणेश लेखमाला २०२३ - "मी धनंजय माने, आणि हा माझा बायको पार्वती"

इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ११

इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – १०

इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ३

।। 'हिंग' पुराण - अध्याय दुसरा ।।

।। 'हिंग' पुराण - अध्याय तिसरा ।। (अंतिम)

इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ९