इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ५
पहाटे सहाला वाजणाऱ्या घंटेच्या आवाजाकडे साफ दुर्लक्ष करून, डोक्यावरून रजई पांघरून, सकाळी चांगली साडेआठ वाजे पर्यंत झोप काढली. मग कॉमन रूम मध्ये बसून मानल ने आणून दिलेला नाश्ता आणि चहा झाल्यावर पुन्हा रुममध्ये आलो आणि तयारी करून दहा वाजता समोरच्या ईजिप्शियन अँटीक्विटी म्युझीयमला जाण्यासाठी खाली उतरलो. पर्यटकांच्या गर्दीने म्युझीयमचे आवार फुलून गेले होते. पाच दहा मिनिटे रांगेत उभा राहून २४० पाउंडस चे तिकीट घेतले आणि मग पुढे सिक्युरिटी चेकच्या रांगेत जाऊन उभा राहिलो..
भव्य घुमटाकार छत असलेल्या दुमजली ईमारतीत, १५००० चौ.मी. क्षेत्रफळावर अनेक दालनांमध्ये सुमारे १,२०,००० वस्तूंचा संग्रह असलेले हे म्युझीयम हजारो वर्षांपूर्वीच्या ‘तुत-अंख-अमुन’ आणि ईतर काही फॅरोहच्या दैनंदिन वापरातील वस्तू, भांडी, खेळणी, दागिने, पुतळे, १२ फॅरोहच्या ममीज, मुखवटे, शवपेट्या, पपायरस वरील साहित्य व चित्रे, नाणी अशा हस्तनिर्मित वस्तूंसाठी जगप्रसिध्द आहे.
२०११ च्या क्रांती दरम्यान हिंसक जमावाकडून ह्या संग्रहालयाची तोडफोड झाली होती, त्यात अनेक प्राचीन वस्तूंची नासधूस व लुटालूट झाली. ह्या प्रकाराला आळा घालण्यासाठी शेकडो स्वयंसेवकांनी मानवी साखळी करून संग्रहालयाला वेढा घातला होता. चोरीला गेलेल्या वस्तूंपैकी काही परत मिळवून आणि नासधूस झालेल्या वस्तूंची डागडुजी करून त्या २०१३ मध्ये पुन्हा प्रदर्शनात ठेवल्या आहेत.
मराठीत संग्रहालय वा वस्तूसंग्रहालय असा अर्थ असणाऱ्या ‘म्युझीयम’ ह्या इंग्रजी शब्दाचा उगम ग्रीक पुराणातल्या म्युझेस (Muses) शब्दातून झाला आहे. ग्रीक-रोमन पुराणानुसार म्युझेस म्हणजे ९ कलांच्या प्रेरणा देणाऱ्या ९ देवता आहेत. कलेच्या देवतांचे मंदिर, कलामंदिर किंवा कलेला समर्पित अशा अर्थांनी हा शब्द वापरला जात होता. ईजिप्तच्या इतिहासातल्या पहिल्या (म्युझीयम हि संकल्पना युरोपात उदयास आली असा जरी मतप्रवाह असला तरी काही ईतिहास संशोधकांच्या मते जगातील पहिल्या) संग्रहालयाची मुहूर्तमेढ ई.स.पु. तिसऱ्या शतकात ग्रीक राजवटीतील पहिला टॉलेमि ‘सॉटर’ (Soter) ह्याने अलेक्झांड्रीया मधील आपल्या राजवाड्यात ‘अलेक्झांडर द ग्रेट’ चा ग्रंथसंग्रह ठेवून केली.
ईजिप्तला संग्रहालयाची प्राचीन परंपरा असली तरी कैरो मधील ईजिप्शियन अँटीक्विटी म्युझीयमचा ईतिहास थोडा विचित्र आहे.
• १७८० ते १८३० अशा पन्नास वर्षांच्या काळात ईजिप्त मधील बऱ्याच पुरातन वस्तू पॅरिस व लंडन मधील म्युझियम्स मध्ये पाठवल्या गेल्यावर, १८३५ साली उशिरा का होईना पण ह्या अनमोल ठेव्याचे महत्व लक्षात येऊन तत्कालीन (ऑटोमन साम्राज्याचे मांडलिक असलेल्या) ईजिप्त सरकारने काही शिल्लक वस्तूंची जमवाजमव करून कैरोच्या अझबेकेया जिल्ह्यात एका राजमहालात हे संग्रहालय स्थापन केले.
• त्यानंतर लुक्झर मध्ये नवीन गोष्टी सापडण्यास सुरुवात झाल्यावर, १८४२ साली हा संग्रह कैरोच्या किल्ल्यात हलवण्यात आला.
• १८४८ ते १८५४ ह्या काळात कैरोचा राज्यपाल असलेल्या अब्बास I ह्याने संग्रहाचा बराचसा भाग ऑटोमन साम्राज्याचा सुलतान मेहमूद II ह्याचा पुत्र अब्दुल अझीझ ह्याला भेट म्हणून दिला तर १८५५ मध्ये त्याचा उत्तराधिकारी सैद ह्याने उरलेला संग्रह ऑस्ट्रियाचा सम्राट फ्रान्सिस जोसेफ I चा धाकटा भाऊ मॅक्सिमिलियन I (हा पुढे नेपोलियन III च्या आग्रहावरून मेक्सिकोच्या दुसऱ्या साम्राज्याचा एकमेव अल्पकालीन सम्राट झाला) ह्याला भेट म्हणून देऊन टाकला, जो आता व्हिएन्ना मधील कुन्सथिस्टोरीशेस म्युझियम (Kunsthistorisches Museum, Vienna) मध्ये आहे.
• उत्खननात नवीन वस्तू सापडतच होत्या. मग पुन्हा १८५८ साली, फ्रेंच पुराणवस्तू संशोधक ऑगस्टे मेरीएट च्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या ईजिप्शियन पुरातत्व विभागाने कैरोच्या बुलाक जिल्ह्यातील एका गोदामात नवीन संग्रहालय तयार केले. हि जागा नाईल नदीच्या किनाऱ्याला लागून होती त्यामुळे १८७८ च्या नाईलला आलेल्या पुरात ह्या संग्रहालयाचे प्रचंड नुकसान झाले.
• १८९१ साली परत सगळा संग्रह गिझा मधल्या एका जुन्या राजवाड्यात हलवण्यात आला.
• सातत्याने नवनवीन गोष्टींची भर पडून वाढत चाललेला हा संग्रह अखेर १९०२ मध्ये (ब्रिटीश अंमल असताना) तेहरीर चौकात खास संग्रहालयासाठी म्हणून बांधलेल्या प्रशस्त इमारतीत स्थिरस्थावर झाला.
१९०२ ते आजतागायत ११६ वर्षे याठिकाणी असलेल्या ह्या म्युझियम मधील संग्रहाचे चे २०१८ वर्ष अखेर पर्यंत गिझा येथे पिरॅमिडस पासून २ कि.मी अंतरावर नवीन बांधण्यात आलेल्या भव्य इमारतीत स्थलांतर होणार आहे. अर्थात जुने म्युझियम देखील अस्तित्वात राहिलच पण इथे किती वस्तूंचा संग्रह राहिलं हे अजून स्पष्ट नाहीये.
४,८०,००० चौ.मी. क्षेत्रफळ असलेले, २०१२ साली बांधकामास सुरवात होऊन २०१८ वर्ष अखेर पर्यंत उद्घाटन झाल्यावर, जगातील सर्वात मोठे वस्तुसंग्रहालाय ठरणाऱ्या ह्या ‘ग्रँड ईजिप्शियन म्युझियम (GEM)’ मध्ये ‘तुत-अंख-अमुन’ च्या टॉम्ब मध्ये सापडलेल्या सर्व (५००० हून अधिक) वस्तू प्रदर्शित करण्यात येणार आहेत, सध्या केवळ ह्यातल्या १/३ वस्तूच प्रदर्शित केल्या आहेत. ‘ग्रँड ईजिप्शियन म्युझियम’ संकुलातील पिरॅमिड सारखी त्रिकोणी आकाराची मुख्य इमारत हि ‘ग्रेट पिरॅमिड’ च्या उंचीची असून तिच्या गच्चीवरून सर्व पिरॅमिडस बघण्याची सोय उपलब्ध असणार आहे.
ईजिप्शियन अँटीक्विटी म्युझियम मधील काही निवडक छायाचित्रे:
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पपायरस वरील चित्रे व लेखन:
.
.
.
.
.
.
.
.
मातीची भांडी आणि दगडांवरील लेखन:
.
.
.
.
ईतर काही फोटो:
.
.
.
.
रॉयल ममी हॉल मधील काही ममींचे फोटो.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
म्युझियम बघण्यासाठीची वेळ सकाळी ९ ते संध्याकाळी ५ अशी असली तरी तिथले कर्मचारी ४:३० पासूनच पर्यटकांना बाहेर पडण्याच्या सूचना द्यायला सुरवात करतात, अर्थात ह्या गोष्टीवरून कर्मचारी आणि विशेषतः युरोपियन प्रवाशांमध्ये वादविवाद होतात पण ४:४५ ला दिवे बंद केल्यावर नाईलाजाने तेथून बाहेर पडावे लागते.
इतरांप्रमाणेच मी देखील ४:५० ला तेथून बाहेर पडलो आणि रस्त्याच्या पलीकडे असणाऱ्या एका उपहारगृहात स्पॅनिश ऑम्लेट आणि खुबुस खाऊन पोटातली भूक शांत झाल्यावर ७:०० वाजता एअरपोर्टला जायला निघायचे असल्याने त्याआधी सामानाची बांधाबांध करण्यासाठी सरळ हॉटेल गाठले.
तासाभरात सगळी तयारी करून सामानासहित ६:३० ला कॉमनरूम मध्ये येऊन बसलो. अहमदने आत्ता कैरो एअरपोर्टला जाण्यासाठी आणि अस्वानला पोचल्यावर तिथल्या हॉटेल ट्रान्स्फरसाठी कार बुक करून ठेवल्या होत्या. अस्वानला मला घ्यायला येणाऱ्या हसन नावाच्या ड्रायव्हरचा फोन नंबर त्याने मला दिला. सातला पाच मिनिटे कमी असताना मला पिक-अप करायला आलेल्या मेहमूद नावाच्या ड्रायव्हरने तो खाली उभा असल्याचे रिसेप्शनवर फोन करून कळवले. अहमद स्वतः मला गाडीपर्यंत सोडायला आला आणि अप्पर ईजिप्त मध्ये मनोसोक्त भटकंती करून ११ तारखेला परत या आम्ही तुमची वाट बघत आहोत असे सांगून सुरक्षित व मंगलमय प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रचंड ट्राफिकमुळे एअरपोर्टला पोचायला आम्हाला साडेआठ वाजले. सगळ्या औपचारिकता पूर्ण करून बोर्डिंग गेटपाशी येऊन बसलो. रात्री १०:१५ ला ठरलेल्या वेळी विमानाने टेक-ऑफ घेतला व ७००-७५० कि.मी. चा हवाई प्रवास पूर्ण करून नियोजित वेळी ११:४० ला अस्वानला पोचले.
अस्वान एअरपोर्टवर एक नवीनच प्रकार बघायला मिळाला. इथे येणाऱ्या प्रवाशांना रिसीव्ह करायला आलेले त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी, कॅब किंवा टॅक्सी वाले एअरपोर्टच्या बाहेर ताटकळत न थांबता, थेट बॅगेज कलेक्शन हॉल पर्यंत आत येऊ शकतात. अशाच तिथे आलेल्या लोकांमध्ये माझ्या नावाची पाटी घेऊन उभा असलेला हसन मला दिसल्याने त्याला फोन करायची गरजच पडली नाही. सव्वा बाराला तिथून निघून ‘ऑर्किडा सेंट जॉर्ज’ हॉटेल पर्यंत १८ कि.मी. चे अंतर अर्ध्यातासात पार करून १२:४५ ला मुक्कामी पोचलो.
रात्रपाळीला असलेल्या मिना नावाच्या (पुरुष) रिसेपशनीस्टने फार वेळ न लावता तिसऱ्या मजल्यावरच्या रूमचा ताबा दिला. दिवसभर उभ्या उभ्या म्युझियम बघत फिरल्याने पाय थोडे दुखायला लागले होते. दुसऱ्या दिवशीचा पूर्वनियोजित कार्यक्रम काहीच नसल्याने सकाळी लवकर वगैरे उठण्याचीही घाई नव्हती. अस्वानला सुखरूप पोचल्याचा संदेश घरच्यांना पाठवून मस्तपैकी ताणून दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा