इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ९
हॉटेलच्या खालच्या रस्त्यावरून जाणाऱ्या जीपवर लावलेल्या भोंग्यावरून दिल्या जाणाऱ्या घोषणांच्या आवाजाने सकाळी अलार्म वाजायच्या थोडी आधीच जाग आली. उठून बघितलं तर, शाळकरी विद्यार्थ्यांची भली मोठी स्पर्धात्मक रॅली चालली होती.
सामानाची आवरा आवर कालच करून ठेवली असल्याने फार काही काम नव्हते म्हणून थोडावेळ टी.व्ही. वरचे चॅनेल सर्फ करत वेळ काढला आणि तयारीला लागलो. बरोब्बर आठ वाजता रुफ-टॉप रेस्टॉरंट मध्ये पोचलो. आज जोसेफची साप्ताहिक सुट्टी असल्याने दुसऱ्याच एका थोड्या वयस्कर व्यक्तीने आणून दिलेला नाश्ता झाल्यावर परत रुममध्ये आलो. सामान बेल-बॉयच्या ताब्यात देऊन रिसेप्शन काउंटर गाठले आणि चेक आउट करून आठ पस्तीसला आयमनच्या दुकानावर पोचलो.
आयमन, त्याचा मोंटेसर नावाचा एक मित्र आणि मुस्तफाने पाठवलेला मोहम्मद नावाचा ड्रायव्हर असे तिघेजण दुकानाच्या बाहेर बसले होते. आयमनने आमची ओळख करून दिली आणि मी आज लुक्झोरला जात असल्याचे सांगितल्यावर मोंटेसरने त्याच्या माहरूस नावाच्या लुक्झोरमधल्या मित्राला फोन केला आणि मला भेटून तिथल्या साईट सीईंग बद्दल मार्गदर्शन करण्यास सांगितले. त्यांच्यात झालेल्या बोलण्याप्रमाणे मला आणि ड्रायव्हर मोहम्मदला माहरूसचा फोन नंबर दिला आणि लुक्झोर रेल्वे स्टेशनजवळ आल्यावर त्याला फोन कर तो तुम्हाला स्टेशन बाहेर भेटेल अशी सूचना मोहम्मदला दिली.
आयमन आणि मोंटेसरचा निरोप घेऊन आठ पन्नासला आधी इथून ४८ किलोमीटर्स अंतरावरचे कोम ओंबो (Kom Ombo) मंदिर आणि तिथून ६५ किलोमीटर्स वर इड्फ़ु येथे (Edfu / Idfu) असलेले हॉरस मंदिर बघून लुक्झोरला पोचण्यासाठीचा २२५ कि.मी.चा प्रवास सुरु झाला.
रस्त्याच्या कधी डाव्या तर कधी उजव्या बाजूला समांतर नाईल नदी आणि रेल्वे लाईनच्या सोबतीने प्रवास सुरु होता. आजूबाजूला असणाऱ्या शेतात पिकलेला भाजीपाला आणि चारा घेऊन जाणाऱ्या गाढव गाड्या दिसत होत्या.
दहा वाजता कोम ओंबो टेम्पलच्या मागच्या गेट जवळ आम्ही पोचल्यावर गाडीतून उतरून मी मंदिराच्या दिशेने चालत निघालो. मंदिराकडे जाणाऱ्या निर्मनुष्य रस्त्याचे काम चालू असल्याने ठीक ठिकाणी दगड मातीचे ढिगारे होते. तिकीट काउंटर कुठेच दिसत नसल्याने उजव्या बाजूला लांब अंतरावर उभ्या असलेल्या दोन महिला पोलिसांना खुणेने ते कुठे आहे असे विचारले तर त्यांनी पुढे जाण्याची प्रतीखूण केली. थोडं अजून चालल्यावर थेट मंदिराच्या समोरच पोचलो.
ई.स.पूर्व तिसऱ्या शतकात टॉलेमिक राजवटीत बांधण्यात आलेले सोबेक (Sobek) आणि हॉरस (Horus) अशा एकमेकांशी शत्रुत्व असलेल्या देवांचं हे मंदिर ईजिप्त मधल्या सर्व प्राचीन मंदिरांमध्ये त्याच्या दुहेरी स्वरूपामुळे वैशिष्ठ्यपूर्ण समजले जाते.
जसा डावीकडचा भाग, अगदी तसाच त्याच्या आरशातील प्रतिमेसारखा प्रमाणबध्द रीतीने बांधलेला उजवा भाग अशी त्याची संरचना आहे. डावी कडच्या भागात सोबेकचे म्हणजे मगरीच शीर असलेल्या सेठ ह्या वाळवंट, वादळ, अराजक, आणि हिंसेच्या देवाचा अवतार मानल्या जाणाऱ्या देवाचे आणि उजवीकडच्या भागात सूर्याचा अवतार मानल्या गेलेल्या हॉरसचे देऊळ होते. मागच्या बाजूला ई.स.पूर्व पंधराव्या शतकातील फॅरोह कालीन मूळ मंदिराचे अवशेषही दृष्टीस पडतात.
हजारो वर्षात आलेल्या पुरामुळे आणि भुकंपामुळे ह्या भव्य मंदिराची बरीच पडझड झाली असून रिस्टोरेशनचे काम सुरु आहे.
मी सकाळी लवकर पोचल्याने पर्यटकांची अजिबात गर्दी नव्हती. संपूर्ण मंदिर परिसरात रिस्टोरेशनच्या कामावरचे काही मजूर, चार-पाच पोलीस आणि सेल्फी काढत फिरणाऱ्या दोन स्थानिक कॉलेजच्या विद्यार्थिनी एवढीच मंडळी तिथे होती.
कोम ओंबो मंदिराची आणखीन काही छायाचित्रे.
मंदिराच्या आवारातच एका कोपऱ्यात छानसे क्रोकोडाईल म्युझियम आहे. ह्या ठिकाणी केलेल्या उत्खननात एक मगरींची दफनभूमी आढळून आली. तिच्यात सापडलेल्या ३०० च्या आसपास मगरींच्या ममीं पैकी २६ लहान-मोठ्या आकाराच्या ममी इथे प्रदर्शित केल्या आहेत.
क्रोकोडाईल म्युझियम मध्ये प्रवेश करताना तिथल्या कर्मचाऱ्याने माझ्याकडे फोटोग्राफीचे तिकीट आहे का अशी विचारणा केली, मुळात मला इथपर्यंत येताना कुठेच तिकीट काउंटर न दिसल्याने मी विदाउट तिकीट प्रवेश केला होता त्यामुळे मी त्याला माझ्याकडे ते नसल्याचे सांगितल्यावर त्याने मला आत फोटो काढू नका अशी सूचना दिली.
मंदिर आणि म्युझियम बघून बाहेर पडलो आणि सव्वा आकराला गाडीजवळ पोचलो आणि इड्फू च्या दिशेने प्रवास सुरु झाला. कोम ओंबो ते इड्फू ह्या पट्ट्यात बरेच उसाचे मळे लागले. १ वाजता इड्फू मंदिराच्या पार्किंगलॉट मध्ये आम्ही पोचलो. भर उन्हात जवळपास अर्धा किलोमीटर चालल्यावर लागणाऱ्या तिकीट काउंटरवरून १०० पाउंडस चे तिकीट घेतले आणि मंदिराच्या आवारात प्रवेश केला./p>
ई.स.पूर्व तिसऱ्या शतकात टॉलेमिक राजवटीत बांधण्यात आलेल्या ह्या हॉरसला समर्पित मंदिराचा ई.स.पूर्व पहिल्या शतका पर्यंत विस्तार केला गेला. ईजिप्त मधल्या अनेक प्राचीन मंदिरांमध्ये हे मंदिर त्यातल्यात्यात नवीन असल्याने खूपच सुस्थितीत आहे. इथली ग्रीक-रोमन टॉलेमिंची प्राचीन ईजिप्शियन पोशाखातली भित्तीशिल्पे प्रेक्षणीय आहेत.
चौथ्या शतकात रोमन शासकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यावर प्राचीन परंपरांचे पालन करण्यास प्रतिबंध केल्याने पुढच्या काळात चर्चच्या चीथावणीवरून ह्या शिल्पांचे थोड्याफार प्रमाणात विद्रुपीकरण केले गेले, परंतु नंतर वाळूच्या ढिगाऱ्याखाली अर्ध्यापेक्षा जास्त मंदिर गाडले गेल्याने जास्ती प्रमाणात त्याची नासधूस होण्यापासून त्याचा बचाव झाला.
इड्फू येथील हॉरसच्या मंदिराची आणखीन काही छायाचित्रे.
हे भव्य मंदिर बघून बाहेर पडेपर्यंत अडीच वाजून गेले होते. मधल्या वेळात मोहम्मद जेवून आला होता पण मला भूक लागली असल्याने मंदिराबाहेरच्या एका स्टॉल वरून दोन फलाफेल सँडविच आणि पाण्याची बाटली पार्सल घेऊन लुक्झोरच्या रस्त्याला लागलो.
रस्त्यात काही ठिकाणी ट्राफिक लागल्यामुळे इड्फू ते लोक्झोर ह्या ११३ कि.मी.च्या प्रवासाला जवळपास ३ तास लागले आणि आम्ही ५:३० ला लुक्झोर रेल्वे स्टेशनच्या बाहेर पोचलो. मोंटेसरच्या सुचनेप्रमाणे तिथे पोचल्यावर मोहम्मदने माहरुसला फोन केल्यावर तो १० मिनिटांत तेथे पोचत असल्याचे त्याने सांगितले.
मुंबईची प्रचंड गर्दी असलेली रेल्वे स्टेशन्स बघायची सवय असल्याने अगदी तुरळक लोकांचा वावर असलेले लुक्झोर स्टेशन फार विलोभनीय वगैरे वाटत होते.
सांगितल्या प्रमाणे खरोखर १० मिनिटांत पन्नाशीच्या आसपास वय असलेला, लुक्झोर मधला प्रथितयश ट्रॅव्हल एजंट माहरुस तिथे पोचला आणि गाडीत येऊन बसला.
आवश्यक तेवढी माहिती माझ्याकडून घेतल्यावर, लुक्झोर मधल्या मुख्य पर्यटन स्थळांची जसे कि ईस्ट बँक वरची कर्नाक टेम्पल आणि लुक्झोर टेम्पल, वेस्ट बँक वरची हॉट एअर बलून फ्लाईट, तसेच व्हॅली ऑफ किंग्स, हॅतशेपस्युत टेम्पल, हाबू टेम्पल इत्यादींची त्याने थोडक्यात माहिती दिली. ह्या सगळ्या प्रायव्हेट आणि सीट-इन-कोच टूर्स त्याच्याकडे उपलब्ध असून त्यासाठी असलेले दरही सांगितले. गाडीतून खाली उतरताना मला त्याचे व्हिजिटिंग कार्ड देऊन तुम्हाला वेळ असेल तेव्हा फोन करा अधिक माहिती देण्यासाठी माझा प्रतिनिधी तुम्हाला भेटायला हॉटेलवर येईल असे सांगून तो निघून गेला.
मला त्याचा प्रोफेशनल अप्रोच आवडला, उगाच कुठलं पाल्हाळ लाऊन बोलणं नाही कि लोचटपणे त्वरित बुकिंगसाठी मागे लागणं नाही.
त्यानंतर रेल्वे स्टेशन पासून जवळपास १ किलोमीटरवर असणाऱ्या कर्नाक हॉटेलच्या दिशेने आम्ही निघालो आणि सहा पाचला तिथे पोचलो. मला हॉटेलवर सोडून मोहम्मद परत अस्वनला जायला मार्गस्थ झाला.
रिसेप्शन काउंटर वर असलेल्या मुलीने बुकिंग कन्फर्मेशनचा मेल दाखवल्यावर बेल बॉयला माझे समान चौथ्या मजल्यावरच्या मला देण्यात आलेल्या रूममध्ये ठेवायला पिटाळले आणि माझ्याकडून फॉर्म वगैरे भरून घेतल्यावर एका कागदावर वाय-फाय चा पासवर्ड लिहून दिला.
रूम मध्ये आल्यावर फ्रेश होऊन टी.व्ही. बघत लोळत पडलो. आज उन्हात बरंच फिरणे झाल्यने आता बाहेर पडायचा कंटाळा आला होता. उद्याचा दिवस आरामासाठी राखून ठेवलेला होता. साडेआठला रुम सर्व्हिसच्या एक्स्टेन्शन वर फोन करून एक मिडीयम पिझ्झा मागवला आणि तो खाऊन झाल्यावर सव्वा नऊ च्या आसपास झोपून गेलो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा