इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ६


सकाळी पावणे आठला रूम मधला इंटरकॉम खणखणला, पाचव्या मजल्यावर असलेल्या रुफ-टॉप रेस्टॉरंट मध्ये सकाळी ८ ते १० ह्या वेळेत ब्रेकफास्ट करून घेण्याची सूचना द्यायला रिसेपशनीस्टने फोन केला होता.

ब्रश वगैरे करून वरती गेलो, जोसेफ नावाच्या कर्मचाऱ्याने इथे सगळीकडे कॉमन असा खुबुस किंवा ब्रेड, उकडलेलं अंड, बटर, जाम, योगर्ट, ज्यूस, सलाड आणि चहा/कॉफी असे ठराविक पर्दार्थ असलेला कॉन्टिनेन्टल ब्रेकफास्ट आणून दिला व अजून काही हवं असल्यास समोरच्या बुफे काउंटर वरून घेऊ शकता असे सांगितले.

रुफ-टॉप रेस्टॉरंटच्या काचांमधून थोड्याच अंतरावर दिसणारी नाईल नदी, तिच्या पाण्यात मंद वेगाने प्रवास करणाऱ्या फेलुका, नांगरून ठेवलेल्या क्रुझ, नदी मधलं एलिफंटाईन आयलंड, अलीकडचा मोठा रस्ता अशी दृश्य बघत बघत नाश्ता केला आणि परत रुमवर आलो. लोअर ईजिप्त आणि अप्पर ईजिप्त मधील हवामानातला फरक स्पष्टपणे जाणवत होता. कैरो मध्ये असताना रूम मध्ये एकदाही सुरु करायला न लागलेला ए.सी. इथे अस्वानच्या गरम हवेत दिवसा मात्र आवश्यक वाटत होता.

थोडावेळ टाईम पास म्हणून टी.व्ही. लावला, जवळपास सगळ्याच अरबी वाहिन्यांमध्ये नावाला दोन अनोळखी इंग्लिश वाहिन्या होत्या, पण त्यांवर लागलेले चित्रपट फारच रटाळ होते म्हणून तो बंद केला. सकाळपासून होळीच्या शुभेच्छांचे बरेच मेसेज व्हॉट्सॲप वर आले होते, त्यांना उत्तरे दिली आणि मग तयारीला लागलो.

दहाच्या आसपास खाली उतरलो. नाईल च्या किनाऱ्याला लागून असलेल्या हमरस्त्यावर डावीकडून उजवीकडे एक लांब फेरी मारली, काय काय जवळपास आहे त्याची टेहाळणी केली. के.एफ.सी., मॅक डोनाल्डस आणि सलाह-एल-दीन नावाचे अर्धे जमिनीवर आणि अर्धे नाईल मध्ये तरंगते (floating) रेस्टॉरंट, मनी एक्स्चेंज, ए.टी.एम. वगैरे माझ्या हॉटेल पासून जवळच होते. आता मुख्य काम होतं ते म्हणजे उद्याच्या अबू सिंबेल साठी सीट-इन-कोच आणि परवाच्या फिलाई टेम्पल, अस्वान हाय डॅम, अनफिनिश्ड ओबेलीस्क साठी प्रायव्हेट टूर बुक करणे. मग त्यासाठी ३-४ ट्रॅव्हल एजन्सीज मध्ये चौकशी केली. प्रत्येकाच्या किमतीत फार नाही पण पंचवीस-पन्नास पाउंडस कमी-जास्ती असा फरक होता.

फिरत फिरत पुन्हा माझं हॉटेल असलेल्या गल्लीच्या तोंडाशी आलो तर कोपऱ्यावरच असलेल्या अँटीक्स शॉपच्या बाहेर खुर्ची टाकून भला मोठा पितळी शिशा (हुक्का) पीत बसलेल्या, डोक्याचा तुळतुळीत गोटा असणाऱ्या धिप्पाड शरीरयष्टीच्या एका माणसाने आणखीन एक खुर्ची जवळ ओढून तिच्यावर हात आपटत “हेल्लो फ्रेंड, वेलकम टू आफ्रिका...प्लीज कम अँड सीट हिअर” अशी साद घातली. माझ्याकडे वेळ भरपूर होता, उलट तो घालवायचा कसा हाच प्रश्न असल्याने मी पण त्याला प्रतिसाद देत तडक त्याच्या शेजारच्या खुर्चीवर जाऊन बसलो.

कुठून आलात, किती दिवस अस्वान मध्ये आहात, काय काय बघायचं ठरवलं आहे वगैरे चौकशा झाल्या. त्याचं नाव आयमन होतं. काहीशे वर्षांपूर्वी त्याचे भारतीय वंशाचे खापर खापर पणजोबा भारतातून कामधंद्यासाठी ईजिप्त मध्ये आले होते आणि स्थानिक आफ्रिकन मुलीशी विवाहबद्ध होऊन इथेच स्थायिक झाले. त्याचे अर्ध रक्त भारतीय असल्याने त्याला भारतीयांबद्दल विशेष जिव्हाळा असल्याचे त्याच्या बोलण्यातून समजले.

अबू सिंबेल साठी सीट-इन-कोच मी माझ्या हॉटेलतर्फे बुक करावी आणि बाकीच्या प्रायव्हेट टूर्स साठी त्याचा चुलत भाऊ मुस्तफा ह्याच्याशी बोलणी करावी असे त्याने सुचवले आणि फेलुका राईड, एलिफंटाईन आयलंड व ईतर लोकल साईट सीईंग बद्दल मार्गदर्शन केले. आयमनच्या नोकराने बनवलेला चहा प्यायला आणि मग समोरच्या दुकानातून थोडी चिप्सची पाकिटे आणि ज्यूसचे कॅन्स खरेदी केले. उन चांगलंच जाणवत होते म्हणून थोडावेळ आराम करण्यासाठी साडे बारा वाजता हॉटेलवर आलो.

रिसेप्शन काउंटरवर असलेल्या हुसेन नावाच्या वयस्कर मॅनेजर कडे अबू सिंबेल साठी सीट-इन-कोच बद्दल चौकशी केली, त्याने पहाटे ४:०० ची टूर असून २२५ पाउंडस जाण्या-येण्याचे तिकीट असेल असे सांगितले. बाहेर केलेल्या चौकशीत २००, २२५ आणि २५० असे दर मिळाले होते. मी त्याला उद्या पहाटेची टूर बुक करायची असल्याचे सांगितल्यावर त्याने टूर ऑपरेटरला फोन करून माझी सीट कन्फर्म केली आणि मला पहाटे ३:३० ला पिक-अप होईल आणि निघताना ब्रेकफास्ट पार्सल मिळेल असे सांगितले.

रूमवर आल्यावर पुन्हा टी.व्ही. लावला, ‘मिशन: इम्पॉसिबल II’ लागला होता आणि पुढचा ‘मेन इन ब्लॅक’ लागणार होता. चिप्स खात ज्यूस पीत हे दोन चित्रपट बघण्यात चार सव्वाचार तास मजेत घालवून उन कमी झाल्यावर परत बाहेर पडलो आणि सलाह-एल-दीन फ्लोटिंग रेस्टॉरंट गाठले.

नाईलच्या किनाऱ्यावरच्या ह्या रेस्टॉरंट मध्ये बसून ‘स्टेला’ नावाची थंडगार ईजिप्शियन बीअर पीत उडत्या चालीची वेगवेगळ्या भाषेतली गाणी ऐकत, आजूबाजूचा परिसर न्याहाळत सूर्यास्ता पर्यंतचा वेळ फार छान गेला.

सात वाजत आले होते, सकाळी खूपच लवकर उठायचे असल्याने तिथेच एक मिडीयम चीज पिझ्झा खाऊन आठ वाजता लागणारा ‘द वर्ल्ड इज नॉट इनफ’ हा बॉंडपट बघण्यासाठी पावणे आठला रूमवर आलो.

भल्या पहाटे तीन वाजताचा अलार्म लावला, इंटरकॉम वरून फोन करून पहाटे तीनला वेक-अप कॉल करण्याची सूचना रिसेप्शन काउंटरवर दिली आणि चित्रपट बघत बेडवर पडलो. अगदी शेवट जवळ आला असताना झोप अनावर झाल्याने टी.व्ही. बंद करून झोपून गेलो.

* * * * *

तीन वाजता अलार्म वाजला आणि तीन पाचला वेक-अप कॉल आला. उठून खिडकीचा पडदा बाजूला करून बघितलं तर बाहेत मिट्ट अंधार होता आणि काच उघडून पहिली तर बाहेर बऱ्यापैकी थंडी असल्याचे जाणवले. एवढ्या थंड हवेत अंघोळ करण्याचा कंटाळा आला म्हणून ब्रश करून, हात पाय आणि तोंड धुवून फ्रेश झाल्यावर छोट्या सॅक मध्ये चिप्सचे पाकीट, ज्यूसचा कॅन, पाण्याची बाटली भरून जॅकेट घालून खाली उतरलो आणि रिसेप्शन हॉल मधल्या सोफ्यावर पिक-अप ची वाट बघत बसलो.

मोहम्मद नावाच्या रात्रपाळीच्या रिसेप्शनीस्टने केकच्या खोक्या सारखा मोठा ब्रेकफास्ट बॉक्स आणून दिला. सौदी अरेबिया, ओमान आणि दुबई मध्ये अनेक वर्षे नोकरी केलेला आणि दोन महिन्यांपूर्वीच ह्या हॉटेलमध्ये कामाला लागलेला हा मोहम्मद गप्पीदास माणूस होता. आखतात काम करताना त्याचे बरेच भारतीय सहकारी असल्याने त्याला भारतातले राजकारण, भारतीय संस्कृती बद्दल बरीच माहिती होती. सगळ्यात मोठा धक्का मला तेव्हा बसला जेव्हा त्याने (मी देखील आज पर्यंत न बघितलेली) पंतप्रधान नरेंद्र मोदींची अनेक भाषणे दुबईमध्ये आपल्या सहकाऱ्यांबरोबर बघितल्याचे सांगितले.

“भारतीय, पाकिस्तानी, बांगलादेशी, चीनी, फिलिपिनो, युरोपियन, अमेरिकन अशा अनेक देशातील लोकांबरोबर गेली १० वर्षे आखतात काम केले, पण ज्यांच्याशी मैत्री झाली आणि ती आजही टिकून आहे ते फक्त भारतीयच!” असे सांगून त्याने मला त्याच्या काही भारतीय मित्रांच्या फेसबुक प्रोफाईल दाखवल्या तेव्हा मनोमन आनंद झाला.

३:५५ ला गल्लीच्या तोंडावर व्हॅन उभी करून ड्रायव्हर मला न्यायला आला. लांब लांबच्या हॉटेल मधल्या पर्यटकांना आधी पिक-अप करत आल्यामुळे थोडा उशीर झाल्याची माहिती त्याने दिली.

१२+१ क्षमतेच्या त्या व्हॅन मध्ये किती जण बसलेत (कि झोपलेत) हे अंधारात दिसले नाही. मी समोरच दिसणाऱ्या दुसऱ्या रांगेतील रिकाम्या सीटवर जाऊन बसलो, थोडं पुढे गेल्यावर एका हॉटेलमधून, नवरा बायको आणि त्यांचा १२-१३ वर्षांचा मुलगा असे त्रिकोणी चीनी कुटुंब व्हॅनमध्ये सामावून घेतल्यावर आमचा अबू सिंबेलच्या दिशेने २८८ कि.मी. चा प्रवास सुरु झाला.

दक्षिण ईजिप्त (अप्पर ईजिप्त) मध्ये सुदानच्या सीमेपासून केवळ ४० कि.मी. अलीकडे असलेले ‘अबू सिंबेल’ हे ठिकाण ईजिप्त मधील सर्वकालीन राजवटींमधला महान व प्रभावशाली म्हणून सुप्रसिध्द असलेला १९ व्या राजवंशातला तिसरा फॅरोह रॅमसेस II ह्याने ई.स.पु. तेराव्या शतकात एक स्वतःसाठी आणि एक त्याची पट्टराणी ‘नेफरटारी’ साठी खडकात कोरलेल्या दोन भव्य आणि अत्यंत सुंदर अशा प्राचीन मंदिरांसाठी जगप्रसिद्ध आहे.

१८१३ मध्ये ‘बुर्कहार्ट’ नावाच्या स्विस शोध प्रवाश्याने वाळूच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या ह्या मंदिरांचा शोध लावला पण त्यांना वाळूमुक्त करण्यात त्याला अपयश आले. बुर्कहार्ट कडून ह्या मंदिरांविषयी माहिती मिळाल्यावर १८१७ साली त्याच्या ‘जिओवानी बेल्त्सोनी’ नावाच्या इटालियन शोध प्रवासी मित्राने ह्या ठिकाणी उत्खनन करून हि मंदिरे उघडकीस आणली (आणि लुटली).

‘अबू सिंबेल’ नावाच्या एका लहान मुलाने बुर्कहार्ट व जिओवानी बेल्त्सोनी यांना इथपर्यंत पोचण्यासाठी वाटाड्याची भूमिका बजावली होती, त्यामुळे दोघांपैकी कोणीतरी एकाने (नक्की कोणी ह्याविषयी ईतिहास तज्ञांमध्ये मतभेद आहेत.) त्या वाटाड्या मुलाचे अबू सिंबेल हे नाव ह्या ठिकाणाला दिले.

खरंतर ई.स.पु. १२६४ ते १२४४ अशा वीस वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत मुख्य भूमीपासून एवढ्या लांब अंतरावर, निर्मनुष्य वाळवंटात रॅमसेस II ने हि भव्य मंदिरे का कोरली असावीत हे कोडेच आहे. पण त्याच्या मंदिरातील भिंतींवर कोरलेल्या रथावर आरूढ होऊन लढतानाच्या प्रसंग चित्रांवरून कादेश चे युध्द जिंकून हित्तिते साम्राज्यावर मिळवलेल्या विजयाचे स्मारक म्हणून ती कोरली असावीत असा एक मतप्रवाह आहे, परंतु हे युध्द निर्णायक विजय न मिळता दोन्ही साम्राज्यात शांतता करार होऊन संपुष्टात आले होते.

दुसरा मतप्रवाह असा आहे कि, साम्राज्याच्या दक्षिणेकडील शेजाऱ्यांना प्रभावित करून आपली मूर्तिपूजक संस्कृती नुबिया प्रांतात भक्कमपणे प्रस्थापित करण्यासाठी त्याने हि मंदिरे इथे कोरली असावीत. जो जास्त सयुक्तिक वाटतो.

चालत्या व्हॅनमधून टिपलेली वाळवंटातील सूर्योदयाच्या वेळची काही छायाचित्रे.




संपूर्ण वाळवंटी प्रदेशातून असलेला हा प्रवास समोरून येणारी वाहने नसल्यामुळे रस्ता अरुंद असूनही वेगाने पार पडत होता. अंदाजे दोनेकशे किलोमीटर्स पुढे गेल्यावर निर्जन, ओसाड भागात रस्त्याच्या कडेला सशुल्क प्रसाधनगृहांची सोय असलेल्या एका रेस्टॉरंट समोर व्हॅन थांबली.

तिथे काहीजण मोकळे होऊन तर काहीजण चहापाणी पिऊन आल्यावर वाळवंटात थोडे फोटो काढून पुढचा प्रवास सुरु झाला. एक स्पॅनिश व एक ईराणी जोडपे, तीन जणांचे चीनी कुटुंब आणि मी, एक मेक्सिकन व एक थाई असे तीन एकटे प्रवासी आणि दोन ड्रायव्हर्स मिळून एकूण बारा जण त्या व्हॅन मध्ये असल्याचे तिथून निघताना समजले.

अबू सिंबेलचा केवळ काटेरी तारांचे कुंपण घातलेला उघडा बोडका एअरपोर्ट मागे पडला तसे को-ड्रायव्हरने डेस्टीनेशन जवळ आल्याचे सांगून झोपलेल्या प्रवाशांना उठवले. पावणे आठ वाजता प्रवेशद्वाराजवळ पोचल्यावर, दोन्ही मंदिरे पाहण्यासाठी दीड ते दोन तास लागतील, तिकीट काउंटर कुठे आहे आणि बाहेर आल्यावर सगळ्यांनी कुठे एकत्र जमायचे वगैरे सूचना दिल्यावर, आम्हाला तिथे उतरवून दोघे ड्रायव्हर गाडी पार्किंग लॉट मध्ये उभी करायला निघून गेले.

तिकीट काउंटरवर भरपूर गर्दी होती, पण तीन खिडक्या चालू असल्याने रांग भराभर पुढे सरकत होती. १६० पाउंडस चे मुख्य एन्ट्री तिकीट आणि १३+२ अनुक्रमे गाईड फी, आणि कसलीतरी स्थानिक फी अशी एकूण १७५ पाउंडसची तिकिटे काढून सिक्युरिटी चेकच्या रांगेत उभा राहिलो.


तिकिटाच्या रांगेत माझ्या पुढे उभा असलेला आमच्या व्हॅनमधला मेक्सिकन तरुण ह्या रांगेतही माझ्या पुढेच होता. तपासणी साठी नंबर आल्यावर काळ्या पडद्यामागे त्याची सिक्युरिटी गार्डस बरोबर काहीतरी चेष्टा-मस्करी चालू होती, आतले सगळे जण मोठमोठ्याने हसत होते. माझी तपासणी होऊन मी बाहेर पडेपर्यंत तो प्रवेशाच्या कमानी जवळ थांबला होता. माझे नाव आणि देश विचारून झाल्यावर त्याने त्याचे नाव ‘कॉस्वे’ असून तो मेक्सिकोचा नागरिक असल्याचे सांगितले.

आजपर्यंत आयुष्यात अनेक अतरंगी व्यक्तिमत्वाचे लोक भेटले, परंतु ना ओळख ना पाळख, लहान असो कि मोठा, स्त्री असो कि पुरुष, पोलीस असो कि सुरक्षा रक्षक, गाईड असो कि पर्यटक कसलीही तमा न बाळगता समोर येईल त्याची मस्करी करणारा आणि गम्मत म्हणजे ज्याची चेष्टा-मस्करी केली आहे त्याला राग न येता उलट खळखळून हसायला लावणारा आणि स्वतः गडगडाटी हसणारा, थोडा आगाऊ पण हजरजवाबी असा हा कॉस्वे अतरंगीपणात त्या सगळ्यांचा बाप आहे.

पेशाने फायर आर्टीस्ट असलेला आणि १० महिन्यांपूर्वी प्रवासाला निघालेला हा प्रवासी आशिया व आफ्रिका पालथी घालून झाल्यावर आता ईजिप्त नंतर जॉर्डन, इस्राएल, गाझा पट्टी फिरून शेवटी फ्रान्सला जाऊन, जवळपास वर्षभराने स्वगृही मेक्सिकोला परतणार होता.

इंग्रजी भाषेतील नावाचे स्पेलिंग आणि त्याचे देशानुरूप बदलणारे उच्चार ह्यात किती अंतर असते हे ह्या कॉस्वे मुळे परत एकदा प्रकर्षाने जाणवले. झाले असे कि त्याचा डेटा बंद असल्याने त्याने माझ्या फोन वरून स्वतःला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, प्रोफाईल वर त्याच्या नावाचे स्पेलिंग Josue असे होते पण त्याचा उच्चार तो ‘कॉस्वे’ असा करत होता. जेम्स बॉंड ची भूमिका करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये माझा सगळ्यात आवडता अभिनेता पीअर्स ब्रॉसनन असला तरी त्याच्या आधी जेम्स बॉंड साकारणारा स्कॉटीश अभिनेता Sean Connery च्या नावाचा उच्चार सीन कॉनरी न होता शॉन कॉनरी होतो हे जेव्हा समजले होते तेव्हा थोडे आश्चर्य वाटले होते. पण स्कॉटलंड मध्ये होणारा ‘सी’ चा ‘शॉ’ परवडला म्हणायचा एवढा प्रचंड फरक ह्या कॉस्वे नावाच्या स्पेलिंग आणि मेक्सिकन उच्चारात पडत होता.

असो, प्रवेशद्वारापासून सुमारे पाउण किलोमीटर चालून रस्ता डावीकडे वळल्यावर लांबून पहिले दर्शन झाले रॅमसेस II च्या मंदिराचे.


सुमारे सव्वा तीन हजार वर्षांपूर्वी दगडाच्या टेकडीत कोरलेली हि दोन मंदिरे म्हणजे मानवी ईतिहासातला दुहेरी चमत्कार म्हणावा लागेल.

पहिला चमत्कार म्हणजे हजारो वर्षांपूर्वी तांब्याची छिनी व दगडी हातोडी वापरून दगडाच्या टेकडीत खोदलेली व आतील प्रत्येक भिंतीवर युद्धाची व देवतांच्या उपासनेची अप्रतिम प्रसंग चित्रे कोरलेली हि भव्य मंदिरे.

आणि दुसरा चमत्कार म्हणजे आधुनिक काळात अस्वान हाय डॅम बांधून पूर्ण झाल्यावर निर्माण होणाऱ्या ‘लेक नासेर’ ह्या कृत्रिम जलाशयामुळे पूर्णपणे पाण्याखाली जाणाऱ्या ह्या दोनही मंदिरांना स्थलांतरित करून त्यांचे केलेले पुनर्स्थापन.

१९६३ ते १९६८ ह्या काळात युनेस्कोच्या पुढाकाराने अनेक देशांतील पुरातत्व संशोधक, अभियंते आणि कुशल कामगारांच्या आंतरराष्ट्रीय चमूने अवजड यंत्रसामुग्री वापरून ह्या दोन्ही मंदिरांना अत्यंत काळजीपूर्वकरित्या मोठ्या आकाराच्या व जवळपास प्रत्येकी २० ते ३० टन वजनाच्या तुकड्यांमध्ये कापून, मूळ जागेपासून ६५ मीटर्स उंचीवर आणि २०० मीटर्स मागे असलेल्या आजच्या स्थानावर आणून पुन्हा जोडले आणि नैसर्गिक वाटणाऱ्या कृत्रिम टेकड्यांमध्ये ती कोरल्याचा आभास निर्माण केला आहे.. ह्या कामासाठी तेव्हा ४ कोटी अमेरिकन डॉलर्स चा खर्च आला होता.

दोन्ही मंदिरांचे मूळ ठिकाण आणि नवीन ठिकाणी स्थलांतरित केल्यानंतरची जागा ह्याच्या नुबिया म्युझियम मध्ये ठेवलेल्या मॉडेलचे छायाचित्र.

Wikimedia वरून साभार.

दक्षिण दिशेला असलेल्या, ‘रा’ ला (सूर्यदेव) समर्पित पहिल्या मोठ्या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन अशा एकूण चार २० मीटर्स (६६ फुट) उंचीच्या सिंहासनावर बसलेल्या रॅमसेस II च्या भव्य अशा चार मुर्त्या आणि त्याच्या कुटुंबियांचे पूर्णाकृती पुतळे कोरलेले असून आत प्रवेश केल्यावर दोनही बाजूच्या भिंतींवर देवतांच्या मोठमोठ्या उभ्या मुर्त्या कोरलेल्या आहेत. खडकात १८५ फुट आतपर्यंत कोरलेल्या ह्या मंदिरात तीन सभामंडप असून गाभाऱ्यात रॅमसेस II व रा अमुन, रा होराख्ते आणि पीटाह अशा देवांची चार शिल्पे आहेत.

१९६८ साली आजच्या नवीन ठिकाणी पुनर्स्थापित करेपर्यंत आपल्या मूळ ठिकाणी असताना प्राचीन काळातील प्रगत ईजिप्शियन खगोलशास्त्र आणि स्थापत्यशास्त्राचा नमुना ह्याठिकाणी बघायला मिळत होता. २२ ऑक्टोबर आणि २२ फेब्रुवारी ह्या दोन दिवशी उगवणाऱ्या सूर्याची पहिली किरणे गाभाऱ्यापर्यंत आत प्रवेश करून आतल्या चार पैकी तीन मुर्त्यांवर पडून त्या प्रकाशित करत असत. चौथी मूर्ती पीटाह ची म्हणजे कायम अंधारात वास्तव्य करणाऱ्या पाताळाच्या देवाची असल्याने तिच्यावर सूर्यप्रकाश न पडता ती मात्र अप्रकाशित राहत असे.

उत्तर दिशेला असलेल्या, आपल्या अनेक राण्यांपैकी सगळ्यात आवडती राणी नेफरटारी साठी बांधून ‘हॅथोर’ ह्या देवतेला समर्पित केलेल्या आणि आकाराने पहिल्या पेक्षा लहान अशा दुसऱ्या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूना प्रत्येकी ३ अशा १०.५० मीटर्स (३५ फुट) उंचीच्या सहा उभ्या मुर्त्या कोरल्या आहेत. मंदिराच्या आतमध्ये सहा खांबी सभामंडप असून भिंतींवर आणि खांबांवर राणी नेफरटारी हॅथोर देवीची उपासना करतानाची प्रसंग चित्रे कोरली आहेत.

अबू सिंबेल येथील रॅमसेस II आणि नेफरटारी च्या मंदिरांची काही छायाचित्रे.


रॅमसेस II चे मंदिर:







.








नेफरटारीचे मंदिर:






मी आणि कॉस्वे.


आता लेक नासेर मुळे पाण्याखाली गेलेली मूळ मंदिरे जेथे होती ती जागा.:

साधारण सव्वा दीड तासात मी आणि कॉस्वे हि मंदिरे व आजूबाजूचा जलाशय पाहून ड्रायव्हरने सांगितलेल्या ठिकाणी पोचलो. चीनी कुटुंब सोडून बाकीची सगळी मंडळी आधीच तिथे जमली होती, पाच दहा मिनिटांत ते देखील परत आल्यावर आमच्या बरोबर असलेल्या दुसऱ्या ड्रायव्हरने पहिल्याला फोन करून गाडी घेऊन तिथे यायला सांगितले. ड्रायव्हर ची अदलाबदली होऊन पावणे दहाला आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. हॉटेल मधून पार्सल दिलेला नाश्ता केला आणि मी पण बाकीच्या प्रवाशांप्रमाणे डुलक्या काढता काढता गाढ झोपून गेलो. अस्वानला पोचल्यावर आधी चीनी कुटुंबाला सोडून मला हॉटेलच्या गल्लीपाशी ड्रॉप ऑफ केले तेव्हा पावणे दोन वाजले होते.

दुकानाबाहेर आयमन साहेब हुक्का पीत बसलेलेच होते. त्याचा मुस्तफा नावाचा चुलत भाऊ सुद्धा तिथे हजर होता. मग त्याच्याशी माझ्या फिलाई टेम्पल, अस्वान हाय डॅम, अनफिनिश्ड ओबेलीस्क आणि अस्वान ते लुक्झोर च्या प्रवासात कोम ओंबो (Kom Ombo) आणि ईड्फू (Edfu or Idfu) हि मंदिरे बघण्या साठीच्या प्रायव्हेट टूर्स बद्दल बोलणी झाली.

दुसऱ्या दिवशी ३ मार्चला मुस्तफा उपलब्ध नसल्याने मी फेलुका राईड, एलिफंटाईन आयलंड व ईतर लोकल साईट सीईंग उरकावे आणि परवा ४ मार्चला फिलाई टेम्पल, अस्वान हाय डॅम, अनफिनिश्ड ओबेलीस्क बघून त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ५ मार्चला लुक्झोर साठी निघावे असे ठरले.

आयमनने मागवलेलं जास्वंदीच्या फुलाच्या पाकळ्या उकळवून बनवलेलं, ईजिप्त आणि सुदान मध्ये लोकप्रिय असलेलं ‘करकाडे’ (Karkade or Hibiscus Iced Tea) नावाचे बर्फ घातलेलं गुलाबी रंगाचे स्वादिष्ट पेय पिऊन अडीच वाजता मी रूमवर आलो.

टी.व्ही. चालू करून अर्धा संपलेला फास्ट अँड फ्युरिअस आणि संपूर्ण द अमेझिंग स्पायडरमॅन बघण्यात तीन सव्वातीन तासाचा वेळ घालवून सहाच्या आसपास तयार होऊन सलाह-एल-दीन रेस्टॉरंटच्या दिशेने निघालो. कालच्या प्रमाणेच दोन पाइंटस स्टेला बियर बरोबर आज कॉम्प्लीमेंटरी स्नॅक्स म्हणून आणून दिलेला खुबुस आणि बटर असं विचित्र कॉम्बीनेशन खाऊन बऱ्यापैकी पोट भरल्यावर थोडावेळ नाईलच्या किनाऱ्यावर भटकून नउच्या सुमारास हॉटेलवर परतलो.

उद्या लोकल साईट सीईंग करायचं असल्याने सकाळी लवकर उठण्याची घाई नव्हती, पण आज पहाटे खूप लवकर उठून झालेल्या जवळपास सहाशे किलोमीटर्सच्या प्रवासाने थकवा जाणवत होता. थोडावेळ व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर मित्रमंडळींचे धुळवड साजरी करतानाचे फोटो बघत असताना मधेच केव्हातरी झोप लागली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय नेम इज बॉंड... जेम्स बॉंड!

दुबई : मरूभूमितले नंदनवन - भाग १

कॅवलरी टँक म्युझियम (रणगाडा संग्रहालय) - अहमदनगर

मिपा श्रीगणेश लेखमाला २०२३ - "मी धनंजय माने, आणि हा माझा बायको पार्वती"

इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ११

इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – १०

इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ३

।। 'हिंग' पुराण - अध्याय दुसरा ।।

।। 'हिंग' पुराण - अध्याय तिसरा ।। (अंतिम)

इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ९