।। 'हिंग' पुराण - अध्याय दुसरा ।।
"अच्छा जल्दी बताओ हिंग को इंग्लिश में क्या बोलते हैं?"
२०१३ सालच्या 'क्वीन' (Queen) ह्या हिंदी चित्रपटात अॅमस्टरडॅम मधल्या इटालियन रेस्टोरंटचा मालक 'मार्सेलो' त्याच्या व्यवसायाला स्पर्धा निर्माण करू पाहणाऱ्या ऑस्ट्रेलियन प्रतिस्पर्ध्यावर मात करण्याच्या उद्देशाने 'रानी' (कंगना रानौत) समोर भारतीय खाद्यपदार्थ तयार करून विकण्याचा आव्हानात्मक प्रस्ताव ठेवतो.
मार्सेलोचा प्रस्ताव स्वीकारलेली रानी रेस्टोरंटच्या भटारखान्यात 'हिंग' शोधत असते, पण तिथे कोणालाच हिंग म्हणजे काय हे माहित नसल्याने ती भारतात रात्री ढाराढूर झोपलेल्या आपल्या आईला फोन करून "अच्छा जल्दी बताओ हिंग को इंग्लिश में क्या बोलते हैं?" असा प्रश्न विचारते.
त्यावर उत्तर माहिती नसलेली तिची आई हाच प्रश्न आपल्या नवऱ्याला विचारते, पण त्याच्याकडूनही काही उत्तर न मिळाल्याने ती मोबाईल फोनवरून अन्य तीन महिलांची झोपमोड करून त्यांना हा प्रश्न विचारते.
त्यांच्यापैकी पहिली महिला "आय थिंक... मस्टर्ड", दुसरी महिला "अरे वो डब्बी पे जो छोटासा लिक्खा होता है, कभी पर पढा नही क्या लिक्खा होता हैं" असे उत्तरतात तर तिसऱ्या महिलेकडून उत्तर मिळण्याऐवजी तिच्या घोरण्याचाच आवाज येतो.
शेवटी तिची आई "हॅलो रानी, बेटा, हिंग को हिंग हि केहते हैं इंग्लिश में" असे ढळढळीत चुकीचे उत्तर देऊन मोकळी होते.
आपल्यापैकी अनेकांनी हा चित्रपट पाहिला असेल, त्यातला वरील प्रसंग आठवतो का?
'क्वीन' हा चित्रपट चांगला होता, तो बॉक्स ऑफिसवरही चांगला यशस्वी ठरला, ६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभात ह्या चित्रपटाला "सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट" आणि कंगना रानौतला "सर्वोत्कृष्ट अभिनेत्री" आणि अन्य चार पुरस्कारही प्राप्त झाले होते, हे सगळं छानच पण त्याच बरोबर ह्या चित्रपटाने एका साध्याश्या, नर्मविनोदी प्रसंगातून 'हिंगाला इंग्रजीत काय म्हणतात' हे माहिती नसलेल्या लाखों प्रेक्षकांना त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यास उद्युक्तही केले होते.
असो, इंग्रजीत - असाफोटीडा । संस्कृतमध्ये - 'हिंगु' । मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू आणि नेपाळीमध्ये - 'हिंग' । काश्मिरीत - यांग/यांगे । बंगालीत - 'हीं' । कानडीत - 'इंगु' । तामीळमध्ये - 'पेरूंगायम' । तेलगूमध्ये - 'इंगुवा' । मल्याळम मध्ये - कायम । ओडियामध्ये - 'हेंगु' अशा विविध भारतीय भाषांमध्ये विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या हिंगाचा भारतातला थोडा इतिहास आणि त्याची निर्मिती प्रक्रिया आपण पहिल्या अध्यायात पाहिली, आता भारतासहीत आशिया, आफ्रिका, युरोप आणि दक्षिण अमेरीका अशा चार खंडांपर्यंतचा हिंगाचा प्रसार आणि त्याच्या वापराची थोडी माहिती पाहू.
प्राचीन काळापासून युद्धासाठी असो कि व्यापारउदिमासाठी, जेव्हा माणसे आपल्या मूळ प्रदेशातून सीमोल्लंघन करत तेव्हा ते आपले अन्नपदार्थ सोबत घेऊन जात आणि परमुलुखातून परतताना तिथले अन्नपदार्थ आपल्या सोबत घेऊन येत असत, त्यामुळे जगभरात अनेक वस्तूंची आणि खाद्यसंस्कृती / खाद्यशैलींची आंतर्देशीयच नाही तर आंतरराष्ट्रीय आणि आंतरखंडीय देवाण-घेवाण झालेली आपल्याला बघायला मिळते. अरब व्यापारी, पर्शिअन, ग्रीक, रोमन, तुर्की, मोगल अशा साम्राज्यवादी आणि पोर्तुगीज, स्पॅनिश, डॅनिश, डच, ब्रिटिश, फ्रेंच, जर्मन, इटालियन, बेल्जियन ह्या युरोपिअन साम्राज्य / वसाहतवादी राजवटींमुळे अशा देवाण-घेवाणी मोठ्या प्रमाणावर झाल्या.
★ आशिया आणि आफ्रिका :
आजचे इराक, सीरिया हे देश आणि इराणच्या पश्चिमेकडील व तुर्कस्तानच्या आग्नेयेकडील प्रदेशाचा समावेश होणाऱ्या 'मेसोपोटेमिया' मधल्या प्राचीन 'सुमेर' संस्कृतीचे वायव्य भारतात अस्तित्वात असलेल्या 'हडप्पा' संस्कृतीशी (प्राचीन सिंधू संस्कृती) असलेले व्यापारी संबंध किमान चार हजार वर्षे जुने असल्याचे पुरावे १९५४ साली गुजरात मधल्या 'लोथल' (Lothal) येथे हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडलेल्या ठिकाणी झालेल्या उत्खननात मुद्रांच्या (seals) स्वरूपात सापडले आहेत. 'भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या' (Archaeological Survey of India) दाव्यानुसार ह्या परिसरात इ.स. पूर्व सुमारे चोवीसशे वर्षे जुन्या प्राचीन बंदराचे अवशेषही सापडले असून त्या दाव्याला 'राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था, गोवा' (National Institute of Oceanography, Goa) ह्या संस्थेने दुजोरा दिला आहे. जवळपास साडेचार हजार वर्षे जुने बंदर असलेल्या ह्या प्राचीन शहरातुन मेसोपोटेमियाशी भारतााचा व्यापार चालत असे.
अरबी द्वीपकल्पाच्या (Arabian Peninsula) भारतीयांशी (Indian subcontinent) असलेल्या व्यापारी संबंधांनाही इ.स. पूर्व तब्बल तीन हजार वर्षे जुना इतिहास असल्याचे पुरावे उर, किश आणि बहारीन येथील उत्खननात सापडले आहेत, ज्यात प्राचीन सिंधू संस्कृतीतल्या वस्तूंचा आणि मुद्रांचा (seals) समावेश आहे. मेसोपोटेमियाचा दक्षिणेकडील अरबी द्वीपकल्पातला प्रदेश, म्हणजे आजच्या इराकमधील 'बसरा' ते भारतातील गुजरातमधल्या प्राचीन बंदरांपर्यंत ये-जा करणाऱ्या जहाजांसाठी अरबी द्वीपकल्पातले 'बहारीन' बंदर हे त्याकाळी मोक्याचे ठिकाण होते.
सुरुवातीच्या काळात अरब व्यापारी पर्शिया (इराण), अफगाणिस्तान मार्गे उंट व घोड्यांचा वापर करून जमिनीवरून, आणि पर्शियन आखातातील बंदरांमधून, जमिन दृष्टीआड होऊ न देता, किनारपट्टीच्या कडेकडेने लहान-मोठ्या बोटींतून प्रवास करत गुजरातच्या किनारपट्टीवरील बंदरांपर्यंत सागरी मार्गाने भारतात येऊन व्यापार करत असत. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी अरबांना नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मान्सून) दिशेचे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्यांनी सौदी अरेबियातील 'जेद्दा', येमेन, ओमान मधील बंदरांतून थेट केरळ मधील मलबार प्रांतापर्यंत मजल मारून हा व्यापार बराच वृद्धिंगत केला. उन्हाळ्यात, साधारण मे महिन्याच्या मध्यापासून मोसमी वारे भारताच्या दिशेने वाहू लागले कि अरब व्यापारी केरळमध्ये येत आणि हिवाळ्यात वारे उलट दिशेने वाहू लागले कि परतीचा प्रवास करत असत.
एकंदरीत भारताचे 'मेसोपोटेमिया' आणि 'अरबी द्वीपकल्पाशी' असलेले प्राचीन व्यापारी संबंध विचारात घेता भूमार्गे आणि जलमार्गे वायव्येकडून भारतात हिंगाचे आगमन फार आधी झाले असावे आणि आयुर्वेदाला त्याचा चांगला अभ्यास करण्याची संधी आणि वेळ मिळाला, तसेच अरब व्यापाऱ्यांकडून थेट आणि नियमित पुरवठा होऊ लागल्याने दक्षिण भारतातही त्याचा प्रसार अधिक वेगाने झाला असावा असे मानण्यास वाव आहे.
भारतीय उपखंडा सहित संपूर्ण आशिया खंडात आणि आफ्रिका खंडातही अरब व्यापाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर संचार होताच त्याशिवाय तुर्कस्तानमार्गे मध्य युरोपापर्यंत त्यांचा व्यापार चालत असे. उत्तर आफ्रिकेशी होणारा त्यांचा व्यापार इजिप्तमार्गे जमिनीवरून तर पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेशी होणारा व्यापार समुद्रमार्गे होत असे.
आजही जवळपास संपूर्ण आफ्रिका खंडात हिंगाचा कमी-अधिक प्रमाणात स्वयंपाकासाठी वापर होत असला तरी फार पूर्वीपासून अनेक अरब व्यापारी स्थायिक झालेल्या केनिया, टांझानिया आणि मोझाम्बिक सारख्या पूर्व आफ्रिकेतील देशांमध्ये मांसाहारी खाद्यपदार्थांत आणि औषधी म्हणून हिंगाचा वापर लक्षणीय आहे.
अर्थात अरबांनी हिंगाच्या व्यापारातुन आशिया, आफ्रिका आणि काही प्रमाणात युरोपात त्याचा प्रसार नक्कीच केला, पण जगभरातल्या हिंगाच्या औषधी वापरामागे आयुर्वेद आणि युनानी वैद्यकाचा मोठा हात आहे त्याविषयीची माहिती पुढच्या अध्यायात बघूयात.
इस्लामपूर्व सुमारे हजारेक वर्षे आधीपासून अरबांचे आशिया, आफ्रिका आणि युरोपात प्रचंड मोठे आणि मजबूत व्यापारी नेटवर्क होते. सातव्या शतकात अरबांनी इस्लाम स्वीकारल्यावर नव्याने अस्तित्वात आलेल्या त्या धर्माचा अल्पावधीतच मोठ्याप्रमाणावर प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ह्या नेटवर्कचा त्यांनी पुरेपूर वापर केला. असो, अरबांचा हा इतिहासही रोचक आहे, पण त्याविषयी पुन्हा कधीतरी...
★ युरोप :
आपल्याकडे प्राचीन लेणी, गुंफा आणि मंदिरांबाबत काही माहिती नसेल तर बेधडकपणे ती 'पांडवकालीन' असल्याचे ठोकून देण्याची जी प्रथा आहे, ती मला वाटतं युरोपियन लोकांना आधी माहिती नसलेल्या कुठल्याही प्राचीन गोष्टीचे/वस्तूचे श्रेय 'अलेक्झांडर द ग्रेट' ला देण्याच्या आणि त्यातून अनेक सुरस अशा भाकड कथा जन्माला घालण्याच्या त्यांच्या प्रथेवरुन पडली असावी! जोक्स अपार्ट, तर ह्या 'सर्वज्ञानी' अलेक्झांडरला त्याच्या पर्शिया (आजचा इराण) स्वारीदरम्यान तिथे 'दैवी अन्नपदार्थ' (फूड ऑफ गॉड) असा लौकिक प्राप्त असलेल्या हिंगाबद्दल समजले होते, पण त्याला म्हणे हिंगाचा स्वाद तत्कालीन ग्रीक लोकं अन्नपदार्थांत वापर करत असलेल्या 'सिल्फिअम' (Silphium) ह्या हिंगाशी साधर्म्य असलेल्या वनस्पती / वनस्पतीजन्य पदार्थाच्या स्वादापेक्षा दुय्यम दर्जाचा वाटला होता.
ग्रीक आणि पुढे रोमन साम्राज्याचा भाग असलेल्या प्राचीन काळातल्या 'सायरीनी / कायरीनी' (Cyrene / Kyrene) म्हणजे आजच्या लिबियातील 'शह्हात' (Shahhat) ह्या शहरातून होणाऱ्या व्यापारात मोठा वाटा असलेली सिल्फिअम हि लिबियामध्ये मूळ असणारी वनस्पती पुढे नामशेष झाली असे मानले जाते. रोमन काव्यांतील तिचे उल्लेख आणि तीन नाण्यांवरची तिची आकृती, इतकेच तिच्या अस्तित्वाबद्दलचे पुरावे आहेत आणि नामशेष झाल्या कारणाने तिच्यावर कुठलेही शास्त्रीय संशोधन/अभ्यास झाला नसल्याने एकूणच तिच्या अलौकिक स्वादाविषयीचे आणि 'अपोलो देवाकडून मिळालेली देणगी' वगैरे रोमन काव्यांतील उल्लेख हे 'पुराणातली वानगी' किंवा हिंदी वाक्प्रचार "जंगलमें मोर नाचा किसने देखा" अशा प्रकारचे आहेत. काही अभ्यासक लुप्त झालेली सिल्फिअम हि फेरुला गटातलीच एक वनस्पती असावी असा अंदाज व्यक्त करतात, तर प्राचीन ग्रीक भूगोलशास्त्रज्ञ, तत्ववेत्ता आणि इतिहासकार 'स्ट्राबो' (Strabo) ह्याच्या मते सिल्फिअम आणि असाफोटीडा हे वेगवेगळे नसून तो एकच पदार्थ होता.
तीन नाण्यांवरील सिल्फिअमची आकृती ▼
असो, तर हि तथाकथित सिल्फिअम वनस्पती नामशेष झाल्यावर रोमन साम्राज्यात तिला पर्याय म्हणून हिंगाचा वापर सुरु झाला आणि त्याला प्रतिष्ठाही लाभली. 'हिंग' आणि 'चिलगोजा' (Pine Nuts) एकत्र करून बरणीत साठवून ठेवायची त्यांची पद्धत होती. (कदाचित शुद्ध हिंग आणि पाईन नट्सची पावडर एकत्र करून ते बांधानी हिंग / Compounded Asafoetida तयार करत असावेत असा माझा अंदाज.) ह्या हिंगाचा वापर ते औषध म्हणून आणि फळांचे काप व भाजलेल्या मांसावर शिंपडून खाण्यासाठी करत असत. पुढे पाचव्या शतकात रोमन साम्राज्य लयास गेल्यावर मात्र आजच्या इंग्लंड, वेल्स, फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली, ग्रीस, पोर्तुगाल, स्पेन, जिब्राल्टर, हंगेरी, लक्झेंबर्ग, बेल्जियम, ऑस्ट्रिया, बोस्निया, बल्गेरिया, अल्बानिया, रोमेनिया, स्लोव्हेनिया, क्रोएशिया, मोल्दोव्हा, युक्रेन अशा तत्कालीन रोमन साम्राज्याचा भाग असलेल्या युरोपिअन देश / प्रांतांमध्ये खाण्यासाठी होणारा हिंगाचा वापर कमी कमी होत सोळाव्या शतकापर्यंत जवळपास पूर्ण बंद झाला.
एकेकाळी रोमन साम्राज्याचा भाग असलेल्या फ्रान्स मध्ये मात्र रोमन साम्राज्याच्या लयानंतरही काही प्रमाणात घरगुती व बराचसा व्यावसायिक स्तरावर होणारा हिंगाचा वापर सुरु राहण्यात किंवा पुन्हा सुरु होण्यात कदाचित त्यांच्या "पूर्वेचे पॅरिस" (Paris of the East) आणि "पूर्वेचे फ्रेंच रिव्हिएरा" (French Riviera of the East) अशा टोपणनावांनी ओळखल्या जाणाऱ्या 'पॉंडिचेरी' (Pondicherry - आताचे पुदुच्चेरी) ह्या सतराव्या शतकापासून पुढे सुमारे २८० वर्षे फ्रान्सच्या अधिपत्याखाली राहिलेल्या दक्षिण भारतातील फ्रेंच वसाहतीशी सुरु राहिलेली सांस्कृतिक देवाणघेवाण कारणीभूत ठरली असावी.
फ्रान्सची राजधानी, युरोपातील एक प्रमुख शहर, 'कला', 'फॅशन', 'आहारशास्त्र' (Gastronomy) आणि 'संस्कृतीचे' जागतिक केंद्र म्हणून लौकिक असलेले 'पॅरिस' शहर 'बहुगुणी' हिंगाचा वैविध्यपूर्ण असा शैलीदार वापर करण्याच्या बाबतीत मागे राहिले असते तरंच नवल! उत्तम अन्न खाण्याची आवड / अभिरुची बाळगणाऱ्या खवय्यांसाठी तयार करण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये मसाल्यातला एक घटक म्हणून हिंगाचा प्रत्यक्षरित्या तर बीफ स्टीक्स आणि तत्सम पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हॉट प्लेट्स वर हिंगाचा खडा चोळून अप्रत्यक्षरीत्या त्यांचे स्वादमूल्य वाढवण्यासाठी पॅरिसमधल्या नामचीन उपहारगृहांमध्ये हिंगाचा वापर केला जातो.
अत्युच्च दर्जाची आणि मौल्यवान सुगंधी द्रव्ये (Perfumes) आणि सौन्दर्यप्रसाधने (Cosmetics) तयार करण्यासाठी जगभरात सुप्रसिद्ध असलेले पॅरिसमधील अनेक आघाडीचे उत्पादक आपल्या उत्पादनांमध्ये हिंगाचा वापर करतात. वरच्या फोटोत नमुन्यादाखल दिलेले 'कार्वेन' (Carven), 'लार्टीजन परफ्यूमर' (L'Artisan Parfumeur) आणि 'पिअर बालमीन' (Pierre Balmain) सारखे उच्चभ्रू ब्रॅंड्स आपल्या 'मा ग्रिफ' (ma griffe), 'प्रिमिअर फिजिए' (Premier Figuier) आणि 'व्हेन्ट व्हर्ट' (Vent Vert) सारख्या महागड्या परफ्यूम्सच्या टॉप नोट्स मधल्या घटक पदार्थांच्या यादीत 'असाफोटीडा'चा उल्लेख करतात हे विशेष!
वास्तविक 'फेरुला असाफोटीडा' ह्या वनस्पतीच्या शास्त्रीय नावावरून इंग्रजीत हिंगाला 'असाफोटीडा' असे नाव दिले गेले असले तरी हिंगाची तीव्र चव आणि उग्र वासामुळे इंग्रजी बोलीभाषेत ते 'Devil's dung' आणि फ्रेंच मध्ये 'Merde du Diable' (ज्याचा अर्थ 'सैतानाचे शेण' असा होतो) अशा हेटाळणी कारक नावांनी ओळखले जाते, ह्या पार्शवभूमीवर पॅरिसमधील उत्पादकांकडून परफ्युम्स आणि कॉस्मेटिक्स मध्ये सुगंध निर्मितीसाठी केला जाणारा हिंगाचा वापर विस्मयकारक वाटतो.
सतराव्या शतकात जर्मन निसर्गशास्त्रज्ञ आणि चिकित्सक 'एंगलबर्ट केम्फर' (Engelbert Kaempfer) ह्यांनी १६८३ ते १६९३ अशा दीर्घकाळात केलेल्या रशिया, पर्शिया, भारत, आग्नेय आशिया आणि जपानच्या अभ्यास दौऱ्यातुन मिळवलेल्या ज्ञानावर आधारित लिहिलेल्या पुस्तकात, तत्कालीन पर्शियातील 'लारीस्तान' (आजच्या इराण मधला फार्स प्रांत) येथे त्यांना आढळलेली फेरुला असाफोटीडा वनस्पती, हिंगाचा वापर आणि त्याच्या औषधी गुणधर्मांबद्दलची शास्त्रीय माहिती दिल्याने जर्मनीला हिंगाची पुन्हा नव्याने ओळख झाली.
फ्रान्सचा अपवाद वगळता उर्वरित युरोपात खाण्यासाठी होणारा हिंगाचा वापर आता नगण्य म्हणता येण्यासारखा असला तरी पूर्व युरोपातील आणि विशेषतः मुस्लिम लोकसंख्या जास्त असलेल्या युरोपिअन देशांमध्ये त्याचा औषधी वापर अजूनही बऱ्यापैकी केला जातो.
★ दक्षिण अमेरिका :
दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठा आणि क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या आधारावर जगातील पाचव्या क्रमांकाचा देश म्हणून ओळखला जाणाऱ्या 'ब्राझील' मध्ये हिंगाचा स्वयंपाकात आणि औषधी उपयोग बऱ्यापैकी केला जातो. पण ब्राझीलमध्ये हिंग केव्हा आणि कसा पोचला, आणि त्या खंडातील अन्य देश जसे कि कोलंबिया, व्हेनेझुएला, पेरू, बोलिव्हिया, अर्जेंटिना वगैरे देशांमध्ये देखील त्याचा वापर होतो कि नाही ह्याविषयी खात्रीलायक माहिती मात्र भरपूर शोधाशोध करूनही सापडली नाही, पण पोर्तुगीजांनी ब्राझीलमध्ये हिंग आणला असावा असे मानण्यास वाव आहे.
सुमारे ३४ वर्षांच्या आपल्या भारतातील वास्तव्यात दैनंदिन भारतीय जीवनातले मसाल्याचे महत्त्व जवळून अभ्यासलेले पोर्तुगीज निसर्गशास्त्रज्ञ आणि चिकित्सक 'गार्सिया डी ओर्टा' (Garcia de Orta) ह्यांनी १५६३ साली गोव्यातून प्रकाशित केलेल्या 'कॉलोकीज ऑन द सिंपल्स अँड ड्रग्स ऑफ इंडिया' (Coloquios dos Simples e Drogas da India) ह्या आपल्या २१७ पानी पुस्तकात त्यांनी लिहिले होते, “तुम्हाला हे माहित असलेच पाहिजे की संपूर्ण भारतात आणि त्याच्या सर्व भागांमध्ये स्वयंपाकात सर्वात जास्त वापरली जाणारी गोष्ट म्हणजे 'हिंग', प्रत्येक जेंटियो (हिंदू) ज्याला ते मिळवता येणे शक्य असते तो त्याचे अन्न स्वादिष्ट बनवण्यासाठी ते विकत घेतो.”
पाश्चिमात्य जगतात प्राच्य मसाल्यांवर लिहिलेले पहिले वैज्ञानिक पुस्तक मानले जाणाऱ्या ह्या पुस्तकाची १८७२ साली लिस्बन, पोर्तुगाल मधून दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली.
पोर्तुगीजांचे भारतीय मसाल्यांवरचे प्रेम सर्वश्रुत आहे. त्यात 'गार्सिया डी ओर्टा' ह्यांच्या पुस्तकातून त्यांना समजलेले हिंगाचे स्वादमूल्य आणि औषधी गुणधर्म पाहता त्यांनी आपल्या वसाहतींमध्ये हिंगाचा प्रसार केला असावा. पोर्तुगाल - गोवा - पोर्तुगाल अशा प्रवासात त्यांचीच वसाहत असलेला ब्राझील हा एक महत्वाचा थांबा होता. तसेच ब्राझील मधली बहुतांश गुरे-ढोरे (गाय-बैल) पोर्तुगीजांनी भारतातून तिथे नेली आहेत हे विचारात घेता ब्राझीलमध्ये 'हिंग' सुद्धा पोर्तुगीजांद्वारे पोचला असावा. अर्थात हा केवळ माझा अंदाज असून त्याला कुठलाही अधिकृत संदर्भ नाही!
★ हिंगाचे काही चमत्कारिक उपयोग :
झोराष्ट्रीयन, ज्यू, ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध आणि हिंदू अशा सर्वच धर्मांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जात असल्या तरी देव, दैवी शक्ती, अमानवी शक्ती, सुष्ट-दुष्ट आत्मे, सैतान, भूत-प्रेत, पिशाच्च, दृष्ट लागणे अशा अनेक संकल्पनांना मान्यता आहे. त्यातल्या वाईट गोष्टी-शक्तींपासून बचाव करण्यासाठी त्यांच्या धर्मगुरू, मांत्रिक-तंत्रिकांकडे आपापले काही उपाय आणि तोडगेही आहेत. गमतीची गोष्ट म्हणजे अशा उपाय - तोडग्यांसाठी जगभरात अनेक ठिकाणी हिंगाचा वापर केला जात असल्याचेही ऐकून / वाचून आहे.
♦ प्राचीन पर्शिअन पौराणिक कथेनुसार "देवांचा राजा मनाला जाणाऱ्या 'आहूरा माझदा' (Ahura Mazda - ऋग्वेदात ज्याचा उल्लेख 'असुर महत' असा केला आहे.) ह्या त्यांच्या सर्वोच्च देवाचे वीर्य जमिनीवर पडण्यातून हिंगाच्या वनस्पतीची (फेरुला असाफोटीडाची) उत्पत्ती झाली असल्याने हिंगात दैवी शक्तीचा वास आहे". अशा धार्मिक संदर्भामुळे पर्शियात औषध म्हणून आणि जवळपास प्रत्येक अन्नपदार्थात हिंगाचा वापर होत असे तसेच दुष्ट शक्तींपासून बचाव होण्यासाठी घरात कोळशावर हिंग जाळणे, दुष्ट शक्तींनी ताबा घेतलेल्या व्यक्तीच्या गळ्यात हिंगाच्या वनस्पतीच्या खोडाच्या तुकड्यांची माळ घालणे असे उपाय केले जात. अर्थात आजच्या इस्लामिक इराण मधून झोराष्ट्रीयन धर्म जवळपास नामशेष झाला असला तरी खाण्यासाठी आणि 'सैताना' पासून बचाव होण्यासाठी हे उपाय आजही केले जातात.
♦ तिबेटी शमन / लामा अंतर्ज्ञान प्राप्तीसाठी हिंगाचे सेवन करतात आणि त्यांच्या धार्मिक विधींमध्ये देखील हिंगाचा वापर करतात. तसेच वातावरणातील जीवनावश्यक वायूंचे संरक्षण करण्यासाठी आणि चेटूक निवारणासाठी हिंग जाळण्याची त्यांची पद्धत आहे.
♦ टर्की आणि मध्यपूर्वेतही, पर्शिया (इराण) प्रमाणेच दुष्ट शक्ती / सैताना (Satan) पासून आणि दृष्ट लागण्यापासून (नजर लागणे / Evil Eye) बचाव करण्यासाठी धूप / लोबान प्रमाणे हिंग जाळण्याचा पारंपरिक उपाय जवळपास सर्व धर्मीयांद्वारे (ज्यू, ख्रिश्चन, मुस्लिम) केला जातो.
♦ इजिप्तमध्ये दृष्ट लागण्यापासून (नजर लागणे / Evil Eye) बचाव करण्यासाठी हिंगाचा ताईत बांधण्याची पद्धत आहे. एकंदरीतच इजिप्तबद्द्ल जगातील असंख्य लोकांना (विशेषतः युरोपियन लोकांना) एकप्रकारचे गूढ आकर्षण / कुतूहल असल्याने असे ताईत बांधण्याच्या इजिप्शिअन पद्धतीचा संपूर्ण युरोपात प्रसार झाला होता. आता युरोपात असे ताईत बांधण्याचे प्रकार फारसे होत नसले तरी कोणाची दृष्ट लागू नये म्हणून काहीजण काळ्या कापडाच्या तुकड्यात हिंगाचा खडा गुंडाळून ती पुरचुंडी खिशात/पर्समध्ये ठेवतात. तसेच भुताखेतांना दूर ठेवण्यासाठी 'बाधित' घरात पेटत्या मेणबत्तीच्या ज्योतीखाली वितळलेल्या मेणावर हिंगाच्या तेलाचे (इसेन्शिअल ऑइल) थेंब टाकून जाळण्याचा उपायही काही युरोपिअन देशांमध्ये केला जातो.
।। इति श्री 'हिंग' पुराण द्वितीयोध्याय संपूर्ण ।।
तळटीप: पुढच्या तिसऱ्या (अंतिम) अध्यायात हिंगाचे रासायनिक आणि औषधी गुणधर्म, खाण्याव्यतिरिक्त होणारे त्याचे औषधी उपयोग आणि भारत सरकारने 'फेरुला असाफोटीडा' वनस्पतीची देशात लागवड करून स्वदेशी हिंगाचे उत्पादन करण्याच्या दृष्टीने सुरु केलेलया प्रयत्नांबद्दलची माहिती येणार आहे./
जय हिंद! जय महाराष्ट्र!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा