केशर : गाथा आणि दंतकथा - १ (विहंगावलोकन)
आज गणेश चतुर्थी! गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया..., पायी हळू हळू चाला... मुखाने गजानन बोला..., कपाळी 'केशरी' गंध... बाप्पा तुझा मला छंदच्या गजरात आपल्या घरी गणरायाचे आगमन झाले असेल, विधिवत पूजा-अर्चा, आरती झाल्यावर प्रसाद म्हणून खाल्लेल्या 'केशरी' पेढ्यांची चव जिभेवर रेंगाळत असतानाच नैवेद्द्यासाठी केलेले बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक आणि शिरा, खीर, पुरणपोळी, श्रीखंड अशा 'केशरयुक्त' पंचपक्वान्नांचा समावेश असलेल्या सुग्रास भोजनावर आडवा हातही मारून झाला असेल! गौरी-गणपतीच नव्हे तर नवरात्र, दसरा, दिवाळी, चैत्र पाडवा, अक्षय तृतीया, नारळी पौर्णिमा, गोकुळाष्टमी अशा सणासुदीच्या दिवशी किंवा कुटुंबातील सदस्यांच्या वाढदिवशी किंवा अन्य कुठल्या विशेष अथवा मंगल प्रसंगासाठी तयार केल्या जाणाऱ्या अनेक प्रकारच्या पक्वान्नांत/मिष्टान्नांत केशराचा वापर करण्याची परंपरा आपल्या महाराष्ट्रात पिढीजात चालत आली आहे. पदार्थ गोड असो वा तिखट, सामिष असो वा निरामिष त्यात फक्त तीन ते चार काड्यांचा वापर केला तरी त्या खाद्यपदार्थाला अलौकिक स्वाद आणि सुगंधाच्या बरोबरीनेच मनमोहक